

पुणे; पुढारी वृत्तसेवा : परिवहन आयुक्तांनी रस्त्यावर गाडी धावत असतानाही बोरीवलीतील एका मर्जीतल्या व्यक्तीच्या वाहनाचा टॅक्स माफ केला आहे. कोरोना काळात आमच्या बस बंद होत्या, त्यामुळे आमच्या गाड्यांचाही टॅक्स माफ करावा, या मागणीसाठी खासगी बसचालकांनी गुरुवारी पुणे आरटीओ अधिकार्यांच्या केबिनमध्येच ठिय्या आंदोलन केले.
पुणे बस अँड कार असोसिएशनच्या वतीने गुरुवारी कोरोना काळातील टॅक्स माफ करा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. या वेळी संतप्त बसचालकांनी आरटीओ अधिकार्यांना निवेदन देत, अधिकार्यांच्या केबिनमध्येच ठिय्या धरला. या वेळी एका खासगी बसचालकाने आरटीओ अधिकार्यांना कपडे काढून आत्मदहनाचा इशारा दिला.
या वेळी पुणे बस अँड ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे, कार्याध्यक्ष किरण देसाई, सचिव तुषार जगताप, शिवराज थोरात व ट्रॅव्हल्स संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ट्रॅव्हल्स चालकांकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुजित डोंगरजाळ उपस्थित होते.
यासंदर्भात देसाई म्हणाले, आम्ही आमच्याकडील नॉन युज (वापरात नसलेल्या) गाड्यांचा टॅक्स माफ करण्याची पुणे आरटीओला अनेकदा मागणी केली. आरटीओ इन्स्पेक्टर यांनी अनेकदा आमच्याकडील वाहने येऊन तपासलीदेखील आहेत. मात्र, अद्यापपर्यंत आमच्या वाहनांचा टॅक्स माफ झालेला नाही. याउलट परिवहन आयुक्त यांनी बोरिवलीतील मर्जीतल्या एका व्यक्तीच्या गाडीचा टॅक्स गाडी रस्त्यावर धावत असतानादेखील माफ केला आहे, हे चुकीचे आहे. आम्ही याचा निषेध करतो.
टॅक्स माफी देणे आमच्या हातात नाही, यासंदर्भातील निर्णय परिवहन कार्यालय पातळीवर घेतले जातात. आम्ही पुणे बस असोसिएशनचे निवेदन स्वीकारले आहे. ते आम्ही परिवहन आयुक्त कार्यालयाला पाठवून देणार आहे.
संजीव भोर,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
हेही वाचा