नगर : गुंडेगाव पंचायत समिती गणातील गावे तहानलेली | पुढारी

नगर : गुंडेगाव पंचायत समिती गणातील गावे तहानलेली

रूईछत्तीशी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  बुर्‍हाणनगर पाणी योजना बॅकफूटवर गेल्याने गुंडेगाव गणातील 14 गावांचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. जवळपास 50 टक्के लोकांवर विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या भागातील पाणी प्रश्न सुटणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदार, खासदार यांनी याप्रश्ल लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. नगर तालुक्यातील गुंडेगाव गणातील रूईछत्तीशी, वाटेफळ, साकत, दहिगाव, शिराढोण, पारगाव, गुणवडी, अंबिलवाडी, राळेगण, वडगाव, तांदळी, मठपिंप्री, हातवळण या गावात उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे.

44 गावांची बुर्‍हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून या गावांची तहान भागवली जाते. पण सध्या नगर-सोलापूर रस्त्याच्या कामामुळे या योजनेचा खेळ खंडोबा झाला आहे. बुर्‍हाणनगर पाणी योजेनेचे पाण्याचे आवर्तन देखील वाढून मिळणे गरजेचे आहे. 30 वर्षांपूर्वी असणारी या गावांची लोकसंख्या विचारात घेऊन पाण्याचे आवर्तन ठरविण्यात आले होते. आता लोकसंख्या जवळपास दुपटीने वाढली असून, त्याच तुलनेत पाणी आवर्तन वाढविणे गरजेचे आहे. सध्या या गावात पाण्याची चणचण निर्माण झाली आहे.

नगर तालुक्याचे विधानसभेला विभाजन झाल्याने हक्काचे लोकप्रतिनिधी नगर तालुक्याला राहिले नाहीत. त्यामुळे या भागातील लोकांची पाणी समस्या अजून तीव्र झाली आहे. जिल्हा परिषदेतून पाण्यासाठी अनेक वेळा निधी देण्यात आला. मात्र, लोकप्रतिनिधींनी त्याची कधी दखल घेतली नाही. आता बुर्‍हाणनगर पाणी योजनेसाठी 190 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहीेत. मात्र, त्याची कार्यवाही कधी होणार, याबाबतही संभ्रमावस्था आहे. त्यामुळे आगामी काळात गुंडेगाव गणातील गावे रस्त्यावर उतरून पाण्यासाठी संघर्ष करण्याची शक्यता आहे.

पुढार्‍यांची आश्वासने हवेत विरली
गावागावांत वाड्या-वस्त्या तर पाण्यासाठी व्याकूळ झाल्या आहेत. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आल्या की राजकीय नेते आश्वासने देतात. मात्र, त्याबाबत काहीच कार्यवाही होत नसल्याने ही आश्वासने हवेतच विरताना दिसत आहेत.

विखे, पाचपुतेंनी पुढाकार घ्यावा
खासदार सुजय विखे व आमदार बबनराव पाचपुते यांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. सरकारकडून पाण्यासाठी मोठा निधी मंजूर करून आणावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र, या प्रश्नावर खासदार, आमदार काहीच करत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

हे ही वाचा :

https://pudhari.news/vishwasanchar/564932/will-arctic-ocean-ice-disappear-by-2030/ar

https://pudhari.news/vishwasanchar/564894/sedentary-lifestyle-increases-the-risk-of-dementia/ar

https://pudhari.news/vishwasanchar/564904/female-crocodile-gives-birth-to-cubs-without-a-partner/ar

Back to top button