प्राणिसंग्रहालयातील सर्वात मोठी मगर झाली 120 वर्षांची! | पुढारी

प्राणिसंग्रहालयातील सर्वात मोठी मगर झाली 120 वर्षांची!

सिडनी : माणसाच्या ताब्यात असलेली जगातील सर्वात मोठी मगर ‘कॅसियस’ या नावाने ओळखली जाते. ही मगर आता 120 वर्षांची झाली आहे. एखाद्या मगरीच्या आकारावरून तिचे वय ठरवणे कठीण असते. एकदा मगरी प्रौढ अवस्थेत पोहोचल्या की त्यांची वाढ मंदावते आणि हळूहळू थांबते. माद्यांपेक्षा नर अधिक मोठे असतात. ‘कॅसियस’ ही मगर आता 120 वर्षांची झाल्याचे मानले जात असले तरी हे तिचे अनुमानित वयच आहे. याचे कारण तिचा जन्म नैसर्गिक अधिवासात झाला होता. निव्वळ तिच्या आकारावरून तिचे वय ठरवणे सोपे नाही.

ग्रीन आयलंडवरील मरीनलँड क्रोकोडाईल पार्कमध्ये ही मगर आहे. तेथील क्रोकोडाईल कीपर टूडी स्कॉट यांनी सांगितले की कॅसियस एक नर मगर आहे आणि त्याचा जन्म जंगलातच झाला होता. त्यामुळे त्याचे खरे वय समजून घेणे कठीण आहे. सुमारे 18 फूट लांबीची ही मगर खार्‍या पाण्यातील मगरींपैकी एक आहे.

ऑस्ट्रेलियातील डार्विन येथे ही मगर 1984 मध्ये पकडण्यात आली होती. त्यावेळी तिच्या वयाबाबत 30 ते 80 वर्षे असा अंदाज लावण्यात आला होता. त्यावेळेही ती ऑस्टे्रलियातील मानवी ताब्यात असलेली सर्वात मोठी मगर होती. आता चाळीस वर्षांनंतर आणि ग्रीन आयलंडवरील 35 वर्षांनंतरही तिचे वय वाढतच आहे. यामुळे दीर्घायुष्याबाबत अभ्यास करण्यास संशोधकांना नवी संधी मिळाली आहे. खार्‍या पाण्यातील मगरी 70 वर्षांपेक्षा अधिक काळ जिवंत राहतात.

Back to top button