राहुल अडसूळ
पुणे : राज्य कामगार विमा योजनेत मे अखेरीस वर्ग 3 मधील जवळपास 342 कर्मचार्यांच्या जम्बो बदल्या झाल्या. मात्र वर्षानुवर्षे एकाच जागी खुर्चीला चिकटून बसलेल्या वर्ग-1 आणि 2 मधील विशेषज्ज्ञ, वैद्यकीय अधिकार्यांच्या बदल्या कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या एका पदावरील कामकाजाचा 3 वर्षांचा सामान्य कालावधी पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण बदली करण्यात येते. अधिक प्रभावीपणे काम व्हावे, प्रशासन सुरळीत चालावे, लोकाभिमुख व्हावे, अधिकारी किंवा कर्मचार्यांच्या मनमानीला आळा बसावा, असा या मागचा हेतू असतो.
त्यानुसार राज्य कामगार विमा योजना प्रशासनाने 9 एप्रिल 2018 च्या समुदेशन धोरणाची सहा वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच अंमलबजावणी करत मे महिन्याच्या अखेरीस परिसेविका, वरिष्ठ सहायक, कार्यालय अधीक्षकांसह विविध पदांवरील 342 कर्मचार्यांच्या बदल्या केल्या आहेत. गेल्या काही वर्षांचा विचार केला, तर यंदा कर्मचार्यांच्या जम्बो बदल्या ठरल्या आहेत.
परंतु वर्षानुवर्षे राज्य कामगार विमा योजनेत वर्ग 1 व 2 मधील विशेषज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी हे एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. राज्यभरात ही संख्या जवळपास पाचशेच्या घरात आहे. जूनचा पहिला आठवडा लोटला तरी प्रशासनाने त्यांच्या बदल्या केलेल्या नाहीत. बदल्यांच्या बाबतीत कर्मचारी व अधिकारी यांच्यात वेगळी भूमिका घेतली जात असल्याची चर्चा कर्मचार्यांमध्ये सुरू आहे.
वर्ग 3 व 4 च्या बदल्या झाल्या. मग, वर्ग 1 व 2 मधील डॉक्टर, विशेषज्ज्ञांच्या का होत नाहीत, त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत राज्य कामगार विमा योजनेचे संचालक (प्रशासन) महेश वरुडकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हेही वाचा