लोणी-धामणी : गुप्त धनाच्या आशेने शेतात खोदकाम; अंधश्रद्धेला बळी पडून तिसऱ्यांदा प्रयत्न | पुढारी

लोणी-धामणी : गुप्त धनाच्या आशेने शेतात खोदकाम; अंधश्रद्धेला बळी पडून तिसऱ्यांदा प्रयत्न

लोणी-धामणी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिरदाळे (ता.आबेगाव ) येथे गुप्तधनाच्या हव्यासापोटी काही अज्ञात व्यक्तींनी येथील महादू सरडे, संभाजी सरडे, शिवाजी सरडे, रंगनाथ रणपिसे, जगन्नाथ रणपिसे यांच्या शेताच्या हद्दीवर असलेल्या शेतात खोदकाम केले. याच जागेवर खोदकामाची ही तिसरी वेळ आहे. कोरोना काळातही हा प्रकार घडला होता. त्या वेळी जेसीबीच्या साह्याने खोदकाम केले होते. त्या वेळीही काहीच मिळाले नव्हते आणि आताही काहीच मिळाले नाही. फक्त अंधश्रद्धेला बळी पडून हे असले प्रकार घडत असल्याचे जमीन मालक आणि शिरदाळ्याचे उपसरपंच मयूर सरडे यांनी सांगितले.

संबंधित ठिकाणी दगडी भिंती असून तिथे शेकडो वर्षांपूर्वी कळवातीन नावाची एक महिला राहत असे अशी आख्यायिका जुनी मंडळी सांगतात. त्यावरूनच कोणी तरी याच माहितीच्या आधारावर हा प्रकार केला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बुधवारी (दि.8) सकाळी शिवाजी सरडे शेतावर फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. काही अज्ञात व्यक्ती वारंवार या अशा गोष्टी करत असतील तर त्यांचा शोध घेण्याची गरज आहे. त्यासंबंधी बिट अंमलदार कालेकर यांच्याशी संपर्क करून उपसरपंच मयूर सरडे यांनी घडलेला प्रकार सांगितला. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन तुम्ही तक्रार द्या आपण रीतसर गुन्हा दाखल करू असे सांगितले.

या घटनेमुळे सरडे आणि रणपिसे ही दोन्ही कुटुंबे संभ्रमात पडली आहेत. असले प्रकार थांबले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. पिढ्यानपिढया आम्ही या जमिनीत कष्ट करत आहे. पण काही लोक अंधश्रद्धेला बळी पडून असले प्रकार करत आहेत. त्यामुळे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

बालिंग्यात ज्वेलर्सवर दरोडेखोरांचा गोळीबार

पारगाव : बाजारभाव घसरल्याने फ्लॉवरच्या शेतात सोडली जनावरे

पुणे : पाऊस लांबल्यास पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम

Back to top button