

अनिल तावरे
सांगवी(पुणे) : निरा नदी प्रदूषणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून गाजतो आहे. मात्र, भाजपने या प्रकारात प्रथमच लक्ष घातले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आश्वासनानंतर दि. 23 मे रोजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाकडून निरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली. ही पाहणी करत असताना त्या वेळी निरा नदीच्या प्रदूषणाची पातळी निरा डाव्या कालव्याचे ओढ्यांवाटे पाणी सोडून कमी झाल्याचे दिसून येत होते. या केंद्रीय पथकासमोर बारामती व फलटण तालुक्यातील सहकारी कारखाने व खासगी प्रकल्पांचे पाप झाकण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप उपस्थित शेतकर्यांनी केला होता.
निरा डाव्या कालव्याच्या पाण्यावर उन्हाळ्याची तीन आवर्तने देण्याचा मानस जलसंपदा विभागाचा असल्याचे सांगितले जात होते. परंतु निरा नदीच्या प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी उन्हाळ्यातील तिसरे आवर्तन कमी झाले आहे. राजकीय नेते, प्रदूषण करणारे प्रकल्प व जलसंपदा विभाग शेतकर्यांच्या मुळावर उठला असल्याचे उघड झाले असल्याचा आरोप निरा डाव्या कालव्याचे लाभार्थी करत आहेत. सध्या निरा डाव्या कालव्याच्या वितरिकेवरील शेतातील उसाची पिके जळून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतानाच पाहुणेवाडी येथील ओढ्यातून ऐन कडक उन्हाळ्यातही पाणी वाहताना दिसत आहे. त्यामुळे कोरड उसाला अन् पाणी ओढ्याला असेच म्हणण्याची वेळ आली आहे. (समाप्त)
यंदाच्या कडक उन्हाळ्यात बहुतांश विहिरींमध्ये चिमणीला प्यायला पाणी नाही. परंतु पाहुणेवाडीच्या ओढ्याला पाणी कसे येत असल्याचे पणदरे जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता प्रवीण घोरपडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या ओढ्याला पाणी कुठून येतंय आम्हाला काही माहीत नाही.
हेही वाचा