

पारगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गेल्या 15 दिवसांपासून फ्लॉवरच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. मजुरी, वाहतुकीचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने अनेक शेतकर्यांनी फ्लॉवरची तोडणी थांबवली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील फ्लॉवर उत्पादक शेतकर्यांनी तर थेट फ्लॉवरच्या उभ्या पिकामध्ये जनावरे सोडली आहेत.
तालुक्याच्या पूर्व भागात फ्लॉवर पीक मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेतात; परंतु गेल्या काही दिवसांमध्ये फ्लॉवरला बाजारभावाची साथ मिळाली नाही. सध्याही बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. 1 किलोला फक्त 1 ते 2 रुपये बाजारभाव मिळत आहे. या कवडीमोल बाजारभावाने पिकासाठी गुंतविलेले भांडवल तर दूरच परंतु पिकाची तोडणी, वाहतूक, मजुरीचा खर्चदेखील वसूल होत नाही. त्यामुळे फ्लॉवर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
तालुक्याच्या पूर्व भागातील थोरांदळे, रांजणी, वळती, नागापूर, शिंगवे, पारगाव परिसरातील फ्लॉवर उत्पादक शेतकर्यांनी फ्लॉवरची काढणी थांबवली आहे. अनेक शेतकर्यांनी पीक सोडून दिले आहे. त्यामुळे अनेकांनी मेंढपाळांचा शेळ्या-मेंढ्यांसह जनावरांना फ्लॉवरच्या शेतात चरावयास सोडले दिल्याचे पहावयास मिळत आहे.
यंदा कोबी, फ्लॉवर, टोमॅटो या पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवले गेले. त्यातच उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या काळातदेखील शेतीपिके जगवली; परंतु या पिकांना बाजारभावाची साथ मिळाली नसल्याने भांडवल अंगावर आले आहे.
प्रकाश सुखदेव फुटाणे
फ्लॉवर उत्पादक शेतकरी, थोरांदळे
हेही वाचा