पुणे शहरात 700 मिसिंग लिंक; सल्लागाराचा अहवाल महापालिकेला सादर | पुढारी

पुणे शहरात 700 मिसिंग लिंक; सल्लागाराचा अहवाल महापालिकेला सादर

हिरा सरवदे

पुणे : विकास आराखड्यातील रस्त्याची संपूर्ण जागा ताब्यात आली तरच त्या रस्त्याचा पूर्ण वापर करता येतो, अन्यथा लाखो रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता वापराविना पडून राहतो. याचा प्रत्यय पुण्यात विविध भागात येतो. भूसंपादन आणि इतर कारणांमुळे शहरात आणि समाविष्ट गावांमध्ये 700 लिंक (ठिकाणी) तब्बल 520 कि. मी. लांबीचे रस्ते तुकड्या-तुकड्यामध्ये मिसिंग (रखडले) आहेत. रस्त्याच्या मिसिंग लिंक शोधण्यासाठी नेमलेल्या सल्लागाराने महापालिकेला सादर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

शहरीकरणाचा वेग आणि खासगी वाहनांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहराची लोकसंख्या जेवढी आहे, तेवढीच वाहनांची संख्या आहे. या वाहनांसाठी महापालिकेकडून मुख्य शहरासह उपनगरांमध्ये उड्डाणपूल, ग्रेड सेफरेटर आणि लहान-मोठ्या लांबीचे आणि रुंदीचे रस्ते विकसित केले जातात. मात्र, वाढत्या वाहनांच्या तुलनेत उपलब्ध रस्त्यांची संख्या कायमच तोकडी पडत आहे. त्यामुळे शहरातील बहुसंख्य रस्त्यांवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी नवीन रस्ते आणि प्रकल्पाचे नियोजन करण्यात येते.

शहराच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या रस्त्यांचा महापालिका प्रशासनाने ऑगस्ट 2022 मध्ये एमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने अभ्यास केला. महापालिका हद्दीमध्ये समावेश झालेल्या गावांचा डीपी (विकास आराखडा) आणि आरडीपी (प्रादेशिक विकास आराखडा) डोळ्यांसमोर ठेवून प्रत्यक्ष जागेवर जाऊन रस्त्यांची पाहणी केली. या पाहणीमध्ये भूसंपादन व इतर कारणांमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते रखडल्याचे समोर आले आहे.

रखडलेल्या रस्त्यांमध्ये 2-3 कि. मी.पासून 100, 200 मीटर लांबीच्या अंतराचा समावेश आहे. त्यामुळे वाहनचालकांना काही मीटर अंतरासाठी वळसा मारून इच्छितस्थळी जावे लागते शिवाय तयार झालेल्या रस्त्याचाही वापर काही अंतराच्या मिसिंगमुळे होत नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मिसिंग लिंक जोडण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली होती. त्यांच्या पाहणीत तेवढ्याच किलोमीटरचे रस्ते रखडल्याने समोर आले आहे.

महापालिका हद्दीमध्ये समावेश झालेल्या 34 गावांचा डीपी अद्याप मंजूर झालेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या जुन्या हद्दीत 264 किलोमीटर रस्ते रखडले आहेत.

0 ते 100 मी. लांबीचे 4 कि. मी. रस्ते 80 ठिकाणी रखडले
100 ते 500 मी. लांबीचे 88 कि.मी. रस्ते 300 ठिकाणी रखडले
500 ते 1000 मी. लांबीचे 77 कि.मी. रस्ते 112 ठिकाणी रखडले
एक कि.मी. लांबीच्या पुढे 95 कि.मी. रस्ते 56 ठिकाणी रखडले

म्हणून रस्ते रखडतात…

वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेकडून नवीन रस्ते तयार केले जातात. रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्यासाठी जागा किंवा जागामालकांना टीडीआर आणि एफएसआयच्या माध्यमातून मोबदला दिला जातो. यासाठी प्रशासनाला एक प्रक्रिया राबवावी लागते. यामध्ये वेळ जातो. शिवाय जागामालकांकडून टीडीआर आणि एफएसआय नाकारून रेडीरेकनरच्या तीनपट दराने रोख मोबदल्याची मागणी केली जाते. त्यामुळे भूसंपादन होत नाही. परिणामी, रस्त्यांची स्थिती अर्धवट राहते.

रस्त्याची रुंदी     मिसिंग लिंक (किमी)
9                             5.73
12                           47
15                         7.64
18                           74
20                        1.67
24                      58.60
30                       46.17
36                         0.76
45                         0.20
60                     11.57
65                       9.6

शहराच्या विविध भागात असलेले मिसिंग रस्ते

परिसर           मिसिंग रस्ते (किमी)
औंध                     25.24
वानी पेठ               00.86
बिबवेवाडी            27.36
धनकवडी            11.44
ढोले पाटील रस्ता  16.30
घोले रस्ता             03.63
हडपसर              46.14
कर्वे रस्ता             08.98
कसबा-विश्रामबाग1.55
लोहगाव              00.52
म्हाळुंगे               00.71
मांजरी बु.           01.60
पिसोळी             04.08
सहकार नगर     01.84
संगमवाडी         27.90
शिवणे              01.66
सूस                  00.29
टिळक रस्ता       22.24
उंड्री                 00.94
वडाची वाडी     00.80
वाघोली            00.56
वारजे कर्वेनगर  23.56
येरवडा          18.50
येवलेवाडी     14.44
धायरी           40.00
कोथरूड     23.00

हेही वाचा

Hockey Pro League : नेदरलँडकडून भारत पराभूत

Iga Swiatek : अव्वल मानांकित इगा स्वायटेक उपांत्य फेरीत

WTC Final 2023 : शतकवीर स्मिथ-हेड भारताच्या मुळावर!; ऑस्ट्रेलिया सर्वबाद ४६९, भारत ५ बाद १५१

Back to top button