पुणे: येरवडा कारागृहात सापडला आणखी एक मोबाईल | पुढारी

पुणे: येरवडा कारागृहात सापडला आणखी एक मोबाईल

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पंधरा दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात मोबाईल सापडल्याचा प्रकार घडल्यानंतर कारागृह प्रशासनाने घेतलेल्या झडतीत त्यांना सीमकार्ड नसलेला मोबाईल सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारागृहाची कडक सुरक्षा भेदून मोबाईल आतमध्ये गेलाच कसा? हा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तुरूंग अधिकारी अतुल तुवर यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुवर हे येरवडा कारागृहात तुरूंग अधिकारी पदावर कार्यरत आहेत. कारागृहामध्ये असलेल्या कैद्यांच्या बरॅक तसेच आजुबाजुच्या परिसराची नियमित झडती घेत असतात. 6 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सर्कल 1 येथील बरॅक क्रमांक 8 परिसरामध्ये तुरूंगाधिकारी ए. एस. कांदे हे झडती घेत असताना त्यांना एक इंटेल कंपनीचा मोबाईल बॅटरीसह पण कोणतेही सीमकार्ड नसलेला सापडला. प्रभारी अधीक्षक एस. बी. पाटील यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर तुवर यांनी याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. कारागृहात मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई असताना हा मोबाईल हॅन्डसेट अज्ञात आरोपीने कट करून व नियमांचा भंग करून येरवडा मध्यवर्ती कारागृहात घेऊन गेल्याने अज्ञाताविरोधात भादवि कलम 188, 120 (ब), कारागृह कायदा 1894 च्या नियम 42, 45 (12) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

पुणे: नदीत बुडालेल्या शेतमजूराचा मृतदेह ४२ तासानंतर सापडला

पुणे: ओतूरच्या बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे प्रस्थान

पुणे: कारागृहातील कैदीही रंगले पांडुरंगाच्या भक्तीरसात

 

Back to top button