पुणे: कारागृहातील कैदीही रंगले पांडुरंगाच्या भक्तीरसात | पुढारी

पुणे: कारागृहातील कैदीही रंगले पांडुरंगाच्या भक्तीरसात

पुणे, पुढारी वृत्तसेवा: संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढूरपुरकडे मार्गस्थ होणार आहे. त्या धर्तीवर आता राज्यातील कैदीही पांडुरंगाच्या भक्तीरसात रंगल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्र कारागृह विभाग आणि शरद क्रीडा व सांस्कृतीक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील कारागृहातील कैद्यांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी येरवडा कारागृहात संपन्न होणार आहे.

पुण्यात पालखी आगमनाच्या दिवशी म्हणजे 13 जून रोजी ही महाअंतिम स्पर्धा होणार असल्याची माहिती कारागृह सुधार सेवाचे अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे लक्ष्मीकांत खाबिया देखील उपस्थित होते.

संत तुकाराम यांच्या अभंगाप्रमाणे अध्यात्मातून प्रबोधन आणि प्रबोधनातून मतपरिवर्तन करण्यासाठी ही स्पर्धा भरविण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी एकूण राज्यातील एकूण 29 संघ निवडण्यात आले होते. त्यांचा दिड महिना सराव झाल्यानंतर त्यांची प्राथमिक फेरी पूर्ण झाली असून त्यातील सहा संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी कारागृहांना दिना व प्रकाश धारीवाल यांच्यावतीने कमलाबाई रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ 100 पुस्तकांचा संच, हार्मोनियम, तबला, पखवाज, दहा जोडी टाळ तसेच संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीची प्रतिमा भेट देण्यात आली आहे. कोल्हापूर, तळोजा, अमरावती, पुणे, नागपूर आणि नाशिक या संघाची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. तर बीड, वर्धा, अलिबाग, ठाणे आणि अहमदनगर या जिल्हा कारागृहांच्या संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी सुमारे 350 कैद्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.

प्रथम येणार्‍या संघास ज्ञानोबा तुकोबा महाकरंडक, द्वितीय संघास राष्टसंत तुकडोजी महाराज महाकरंडक, तृतीय क्रमांकास संत शेख महमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

Back to top button