

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत १६ जून रोजी मुक्कामी विसावत आहे. त्या अनुषंगाने राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी जेजुरीच्या पालखी तळाची पाहणी करून आधिकारी वर्गाशी चर्चा केली. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत जेजुरी गडाच्या पायथ्याशी व ऐतिहासिक होळकर तलावाच्या काठावर नऊ एकर जागेत गेल्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी नव्याने पालखी तळ विकसित करण्यात आला आहे.
गुरुवारी (दि. ८) राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जेजुरीच्या पालखी तळाला भेट दिली. यावेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, आळंदी देवसंस्थानचे विकास ढगे, तसेच सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महसूल मंत्री विखे पाटील यांनी जेजुरीत पालखी सोहळ्यासाठी जागा, पाणी, वीज, शौचालये, स्वच्छता, येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग याबाबत चर्चा केली. शासनाच्या वतीने नगरपरिषदेला देण्यात येणारा यात्रा कर अनुदान मंजूर झाला असून तो अद्याप वितरीत झाला नसल्याचे मंत्री विखे यांनी सांगण्यात आले. त्यांनी हा १ कोटी ८६ लक्ष रुपये यात्रा कर अनुदान देण्याबाबत आधिकारी वर्गाला सूचना केल्या. आमदार संजय जगताप, जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी पालखी सोहळ्या संदर्भात माहिती दिली.
यावेळी आमदार संजय जगताप, मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, गटनेते सचिन सोनवणे, भाजपाचे सचिन पेशवे यांनी मंत्री महोदय यांचा सत्कार केला. आळंदी देवसंस्थान ट्रस्टच्या वतीने मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा पालखी मैदानावर सत्कार करण्यात आला. यावेळी नगरपालिका, पोलीस, आरोग्य, वीज, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थितीत होते.
पालखी मैदानावर वृक्षारोपण
नगरपालिकेच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी नऊ एकर जागेत नव्याने पालखी तळ विकसित केला जात आहे. त्या अनुषंगाने पालिकेच्या वतीने पालखी मैदान परिसरात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संजय जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करून मोहीमेला सुरूवात करण्यात आली.
हे ही वाचा :