Mira Road Crime : असा झाला भयंकर विकृतीचा पर्दाफाश; आरोपीच्या कबुलीने पोलिसही आवाक... | पुढारी

Mira Road Crime : असा झाला भयंकर विकृतीचा पर्दाफाश; आरोपीच्या कबुलीने पोलिसही आवाक...

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपूर्वी दिल्लीतील श्रद्धा वालकर प्रकरणाने संपूर्ण भारताला हादरवलं होतं. याच्यापेक्षाही भयंकर मानवी कृत्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मिरारोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करून करवतीने मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मनोज साने (वय ५६) असे आरोपीचे नाव आहे. या संदर्भात मुंबईचे डीसीपी जयंत बजबळे यांनी एएनआय या वृत्तवाहिनीला माहिती दिली. (Mira Road Crime)

Mira Road Crime : करवतीच्या साहाय्याने तुकडे केले

पोलिसांच्या माहितीनुसार,मिरारोड परिसरात आकाशगंगा इमारतीतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये तीन वर्षांपासून मनोज सहानी (वय ५६) व सरस्वती वैद्य (वय ३२) हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी नयानगर पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घराचा दरवाजा उघडताच महिलेचा अर्धा मृतदेह आढळून आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ तपास करून आरोपी सहानी याला ताब्यात घेतले. आरोपीने करवतीच्या साहाय्याने तुकडे करून काही तुकडे नष्ट केल्याचे चौकशीदरम्यान उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार सरस्वती यांचा खून हा दोन ते तीन दिवसांपूर्वी केला असावा.

प्रेशर कुकरमध्ये उकळायचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचा

आरोपी मनोज सहानी याने आपली पार्टनर सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि मृतदेहाचा दुर्गंध येऊ नये म्हणून त्याने माणुसकीला काळीमा लावणारी कृती केली. तो सरस्वती यांच्या मृतदेहाचे करवतीने तुकडे करुन प्रेशरमध्ये उकळून मिक्सरमध्ये बारीक करायचा. बारीक केलेले अवयव पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. यासाठी मनोजने वापरलेले सगळे सामान आणि बाईक पोलिसांनी बुधवारी (दि.७) रात्री पोलिसांनी जप्त केलं आहे. पोलिसांच्या तपासावेळी त्यांना फ्लॅटमध्ये मृतदेहाचे १२ तुकडे सापडले.

श्रद्धा वालकर हत्याकांड पाहून

मूळची अहमदनगरची असलेली सरस्वती अनाथ होती. पोलिसांच्या माहितीनुसार, मनोज शिधावाटप कार्यालयामध्ये कर्मचारी होता. तिथे त्या दोघांची ओळख झाली. ओळखीनंतर ते गेले पाच वर्ष  लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण मनोजने कबुली दिली आहे की, श्रद्धा वालकर हत्याकांड पाहून त्याने सरस्वतीच्या खुनाचा प्लॅन आखला होता.

महिला आयोगाने घेतली दखल

महिला आयोगानेही या घटनेची दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, “सदरील घटना ही अंगावर शहारे आणणारी व संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे करण्यात आले आहेत. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे.  दिवसेंदिवस अशा घटना वाढत असताना गृह विभागाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. सदर प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलिस आयुक्त यांनी स्वतः लक्ष घालून तातडीने कार्यवाही करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा. तसेच मी स्वतः या संदर्भात पोलीस आयुक्त व तपास अधिकारी यांच्याशी सातत्याने संपर्कात असून याबाबत पाठपुरावा करत आहे.

हेही वाचा 

Back to top button