पुणे जिल्ह्यातील 60 तलावांतील गाळ काढण्याचे काम सुरू | पुढारी

पुणे जिल्ह्यातील 60 तलावांतील गाळ काढण्याचे काम सुरू

पुणे : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात 60 ठिकाणी ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ उपक्रमांतर्गत कामांना सुरुवात केली असून, पहिल्या टप्प्यातील 23 कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. धरणांपाठोपाठ सरोवर, तलावांमधील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामांमुळे धरण, तलाव, सरोवर यांची साठवणक्षमता वाढावी, पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये तसेच जमिनीतील सुपिकतेमध्ये वाढ व्हावी, असे अनेक फायदे पाहून राज्य शासनाने ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना जाहीर केली आहे.

राज्य शासनाने जिल्हास्तरांवरील धरणे, शहराच्या हद्दीतून वाहणार्‍या प्रमुख नद्या, सरोवर, तलाव यांमधील गाळ, रेती, माती काढण्यासंदर्भात विविध पातळीवर समिती स्थापन करीत अहवाल सादर करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे किंवा पाझर तलावांमधील झरे गाळामुळे बंद झाले आहेत, अशा ठिकाणांची तपासणी जलसंपदा विभागाने करून पुणे जिल्ह्यातील 1016 पाझर तलावांची यादी तयार केली आहे. जिल्हा प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यात 23 आणि दुसर्‍या टप्प्यात 37 अशा 60 प्रस्तावांना मंजुरी देत कामांना सुरुवात
केली आहे.

’जल्ह्यातील एकूण 60 धरणे, सरोवर, तलावांमधील गाळ काढण्यात येत आहे. या ठिकाणी एकूण दीड हजार क्युबिक मीटर गाळ आहे. याबाबतचे सादरीकरण जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आले होते. महात्मा फुले विकास मंच, नाम, प्रेरणा फाउंडेशन, रेन ट्री फाउंडेशन आदी संस्था या कामात प्रशासनाला मदत करीत आहेत. जास्तीत जास्त लोकससहभाग वाढावा, असे आवाहन केले आहे.

– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

हेही वाचा

U.S. Visa: पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी भारतीयांच्या व्हिसासाठी अमेरिकन संसदेत चर्चा

नगर : ओढ्या-नाल्यांवरील बांधकामे हटवा ; स्थायी समितीच्या आढावा बैठकीत मागणी

Back to top button