पुणे : रुग्णांनी परस्पर औषधे घेणे टाळावे; तज्ज्ञांचे मत | पुढारी

पुणे : रुग्णांनी परस्पर औषधे घेणे टाळावे; तज्ज्ञांचे मत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एक किंवा दोनहून अधिक औषधांचे मिश्रण देण्यावर सरकारने बंदी घातली आहे. औषधे घातक ठरू नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अशा मिश्रणांना पर्यायी औषधे उपलब्ध असल्याने रुग्णांचे औषधांच्या उपलब्धतेबाबत नुकसान होणार नाही. मात्र, रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:च्या मनाने औषधे घेतल्यास आणि त्यामध्ये बंदी घातलेल्या औषधांचा समावेश असल्यास घातक ठरू शकते, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे.
सर्दी, अंगदुखी, वेदना अशा तक्रारींवर बरेचदा एकाहून अधिक गोळ्या सुचवल्या जातात. बरेचदा, यामध्ये पित्ताच्या गोळ्यांचाही समावेश असतो. अशा औषधांची कॉम्बिनेशन दिल्याचा फायदा होतो का, याबाबत पुरेसा अभ्यास झालेला नाही किंवा उपचारात्मक स्पष्टता मिळालेली नाही, त्यामुळे औषध नियंत्रक महामंडळाच्या मागणीनुसार 14 प्रकारच्या औषधांवर यापुढे बंदी घालण्यात आली आहे.

रुग्णांनी काय काळजी घ्यावी?

 कोणत्या औषधांचे किंवा रसायनांचे मिश्रण द्यायचे नाही, याबाबत केवळ डॉक्टरांना पुरेशी स्पष्टता असते.  स्वत:च्या मनाने औषधे घेणे जिवावर बेतू शकते. औषधे घरात शिल्लक असल्यास रुग्ण तीच औषधे घेण्यावर भर देतात. रुग्णांनी असा निष्काळजीपणा टाळावा.
बंदी घातलेली औषधे उत्पादक कंपनीला परत करा

एकापेक्षा अधिक औषधांचे मिश्रण असलेल्या 14 प्रकारच्या गोळ्यांवर केंद्र शासनाने बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विभागामध्ये अन्न आणि औषध प्रशासनातर्फे (एफडीए) बंदी आलेल्या औषधांचा साठा रिटेलरने होलसेलरला आणि होलसेलरने औषध उत्पादक कंपनीला परत करण्याचे आदेश दिले आहेत. फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफसीडी) अर्थात एकाहून अधिक औषधांचे मिश्रण असलेल्या गोळ्यांचा संबंधित आजारावर होणारा परिणाम आणि उपचारात्मक स्पष्टता नसल्याने भारतीय औषध नियामक मंडळाने ताप, सर्दी, डोकेदुखी यामध्ये वापरल्या जाणार्‍या 14 प्रकारच्या औषधांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. यावर केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

बंदी असलेल्या औषधांच्या उपलब्धतेबाबत नियमितपणे पाहणी केली जाणार आहे. बॅन औषधे आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे. रिटेल, होलसेल औषध विक्रेत्यांना उत्पादक स्तरावर औषधे परत करण्यास सांगण्यात आले आहे. औषधांचा तात्पुरता तुटवडा निर्माण होऊ शकतो. मात्र, यावरही तोडगा काढला जाईल.

– श्याम प्रतापवार,
सहआयुक्त (औषधे), अन्न व
औषध प्रशासन, पुणे विभाग

एकाहून अधिक औषधांच्या किंवा गोळ्यांच्या मिश्रणावर सरकारने बंदी घातली आहे. मात्र, ही औषधे रुग्णांची तक्रार जाणून घेऊन कॉम्बिनेशन न करता वेगळी दिली जाऊ शकतात. कोणत्याही आजारामध्ये औषधांचे घातक मिश्रण दिले जाऊ नये, हाच सरकारचा यामागचा उद्देश आहे.
– डॉ. अच्युत जोशी, जनरल फिजिशियन
घातक औषधे बॅन करण्याचा निर्णय योग्यच आहे. रुग्णांना आजारापासून आराम मिळावा, यासाठी डॉक्टर पर्यायी औषध सुचवू शकतात. त्यामुळे काही औषधांवर बंदी आली असली तरी त्यामुळे रुग्णांचे नुकसान होणार नाही. घातक मिश्रणांऐवजी डॉक्टर उपयुक्त औषधोपचार सुचवू शकतात.
– डॉ. रोहिदास बोरसे, एमडी मेडिसिन, ससून रुग्णालय
हेही वाचा

Back to top button