करंजी : पुढारी वृत्तसेवा : नगर-पाथर्डीमार्गे जात असलेल्या कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम सध्या संबंधित ठेकेदाराकडून सुरू आहे; मात्र पूर्वीच्या ठेकेदारांनी केलेले निकृष्ट काम आजही प्रवाशांचा बळी घेत आहे. देवराई गावाजवळ पूर्वीच्या ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत आणि हे खड्डेच सध्या अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. बुधवारी दुपारी मोटरसायकल व कारच्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला.
या महामार्गावर देवराईजवळ पडलेल्या खड्ड्यामुळे दर दोन दिवसांनी अपघात होत आहेत. पूर्वीच्या ठेकेदाराने केलेल्या कामावर नवीन ठेकेदार दुरुस्तीस टाळाटाळ करत आहे. त्यामुळे देवराईत गावाजवळील हा परिसर अपघाताचा परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मागच्या आठवड्यात या ठिकाणी मोटरसायकल व टेम्पोचा अपघात होऊन मोटरसायकलवरील दोघांना आपला जीव गमवावा लागला. बुधवारी (दि. 7) दुपारी मोटरसायकल व आलिशान कारची समोरासमोर धडक झाल्याने मढी येथील एक व्यक्ती या अपघातात गंभीर जखमी झाली.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्यांनी पूर्वीच्या ठेकेदाराकडून जे निकृष्ट काम झालेले आहे ते काम दुरुस्त करून पडलेले खड्डे तत्काळ बुजवण्याची मागणी देवराईचे सामाजिक कार्यकर्ते विष्णू पालवे, राजेंद्र पालवे, रामनाथ पालवे, बाळासाहेब पालवे, भाऊसाहेब क्षेत्रे, नीलेश घुगरे, सुभाष गोरे, सुधाकर क्षेत्रे यांनी केली आहे. आठ दिवसात देवराईजवळील महामार्गावर पडलेले खड्डे न बुजविल्यास देवराई येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.