पुणे : कात्रज डेअरीच्या अध्यक्षांची सोमवारी निवड; उत्सुकता शिगेला | पुढारी

पुणे : कात्रज डेअरीच्या अध्यक्षांची सोमवारी निवड; उत्सुकता शिगेला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज दूध डेअरीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सोमवारी (दि. 12) संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक बोलाविण्यात आली आहे. संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असून, अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार फिल्डिंग लावलेली आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या तालुक्यास अध्यक्षपद मिळणार, याबद्दलची उत्सुकता दूध उत्पादक संस्था आणि शेतकर्‍यांमध्ये आहे.

कात्रज दूध संघाच्या विद्यमान अध्यक्षा केशरताई पवार यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार अध्यासी अधिकारी तथा सहकार विभागाचे विभागीय दुग्ध उपनिबंधक डॉ. महेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता कात्रज डेअरीच्या मुख्यालयात संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सभेचे सूचनापत्रही जारी करण्यात आल्याने अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या संचालकांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार वेळ मिळेल त्यानुसार शनिवारी किंवा रविवारी (दि.10 व 11) राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कात्रजच्या संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. त्यामध्ये कात्रजच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ज्येष्ठांसह नूतन संचालकही शर्यतीत

जिल्ह्यात बारामती आणि इंदापूर दूध संघ स्वतंत्र आहेत. त्यामुळे उर्वरित तालुक्यांतील एकूण 16 संचालकांमधून पक्षश्रेष्ठींकडून अध्यक्षपदाची निवड अपेक्षित आहे. संघात मध्यंतरी पदाधिकारी बदलासाठी एक गट सक्रिय झाला होता. त्यामध्ये काही ज्येष्ठ संचालकांबरोबर कात्रज दूध संघावर प्रथमच निवडून आलेल्या काही संचालकांनीही पक्षश्रेष्ठींकडे अध्यक्षपदासाठी पाठपुरावा केल्याचे सांगण्यात येते. त्यामध्ये संघाचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी ज्येष्ठ संचालक की प्रथमच निवडून आलेल्या संचालकांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार, याबद्दल उत्सुकता आहे.

हेही वाचा

पुणे : अप्पर गंगा नदीवर ‘व्हाईट वॉटर राफ्टिंग’ मोहीम

पुणे : कृष्णा खोर्‍यातील धरणे सुरक्षित; जलसंपदा विभागाचा दावा

लवंगी मिरची : सलाम

Back to top button