WTC Final 2023 : भारताच्या धोरणात्मक चुकांचा ऑस्ट्रेलियाला लाभ | पुढारी

WTC Final 2023 : भारताच्या धोरणात्मक चुकांचा ऑस्ट्रेलियाला लाभ

- निमिष पाटगावकर

कसोटीसाठीच्या संघाची निवड आणि नाणेफेक जिंकल्यावर काय करायचे याचा निर्णय हे बाह्यपरिस्थिती बघून करण्यापेक्षा आपल्या संघातील बलस्थाने ओळखून करायचा असतो. कर्णधार रोहित शर्मा हि दोन्ही तत्वे विसरला. इंग्लडच्या सकाळच्या ढगाळ हवामानाला अणि खेळपट्टीच्या वरवरच्या हिरव्या रंगाला भुलला आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या अश्विनला वगळून चौथा जलदगती गोलंदाज म्हणून उमेश यादवला संघात घेतले तसेच महत्वाची नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हवामानाचा अंदाज हा सकाळचा एक तासढगाळ हवेचा होता पण त्यानंतर निळे आकाश आणि लखलखीत ऊन असे फलंदाजीसाठी उत्तम असणारे इंग्लिश समरचे वातावरण असणार होते. त्याचप्रमाणे खेळपट्टीवर जरी गवत दिसत असले तरी खेळपट्टी कोरडी आहे. या सकाळच्या एक तासाचा फायदा शमी आणि सिराजने सुरवातीला टिच्चून गोलंदाजी करून घेतला. भारतीयांचा गृहपाठ चांगला असल्याने वॉर्नरला राउंड द विकेट आणि ख्वाजाला ओव्हर द विकेट मारा करून जखडून ठेवले व त्यात ख्वाजाला शून्यावर बाद केले. दोघांच्या सहा सहा षटकांचा स्पेल झाल्यावर मात्र उमेश यादव आणि शार्दूल ठाकूर ऑस्ट्रेलियन फलंदाजाना रोखण्यात अपयशी ठरले. शार्दूल ठाकूरने आपल्या गोलंदाजीच्या वेगातील वैविध्याने आणि सिमने थोडे तरी सतावलेपण दुसरीकडून उमेश यादव अगदीच निष्प्रभ होता. वॉर्नरने त्याच्या दुसर्‍याच षटकात चार चौकार मारून प्रतिहल्ला चढवला. वॉर्नरला चांगलाच सूर गवसला होता. शार्दूल ठाकूरने उपाहारच्या आधी त्याला बाद करून भारताला पुन्हा सामन्यात डोके वर काढायला संधी दिली पण यात शार्दूलच्या चेंडूपेक्षा वॉर्नरची चूक आणि भरतचा उत्तम झेल हा बळी मिळवायला कारणीभूत होते. (WTC Final 2023)

दुसरीकडे जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज लाबूूशेन हा क्रीज सोडून पुढे उभा रहात होता आणि चेंडू खेळताना मिडल आणि ऑफ स्टंपच्या रेषेत खेळत होता त्यामुळे त्याला पायचीत पकडणे कठीण होते. लाबूूशेनला पुन्हा क्रीजमध्ये ढकलत बॅकफूटवर खेळायला भाग पडण्यासाठी कर्णधार रोहित शर्माकडून फॉरवर्ड शॉर्टलेग लावून आखूड टप्प्याची रणनीती अपेक्षित होती पण तसे कुठचेही प्रयत्न झाले नाहीत. यामुळे वॉर्नर – लाबूूशेनने सकाळचे अवघड सत्र खेळून काढले. उपहारानंतर लाबूूशेनला शमीने लगेच बाद केले पण स्मिथ – हेड जोडीने ऑस्ट्रेलियन थाटात वेगवान फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाची बाजू मजबूत केली. कुठचाही उत्तम गोलंदाज हा कुठच्याही खेळपट्टीवर उत्तमच असतो. गेल्या अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात साऊथॅम्प्टनच्या ढगाळ हवेत आणि वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर 4 बळी मिळवले होते. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या 7 फलंदाजांत 4 डावखुरे फलंदाज आहेत त्याचप्रमाणे स्मिथला अश्विनने वारंवार बाद करून बकरा बनवले आहे. जितका हा सामना मैदानात असतो तितकाच डावपेचात असतो. अश्विन संघात नाही म्हटल्यावर ऑस्ट्रेलियाचे मानसिक दडपण नक्कीच कमी झाले असेल. आता याच कोरड्या खेळपट्टीवर आपल्याला नेथन लायन समोर चौथा डाव खेळायचा आहे. ट्रेव्हिस हेडचे शतक आणि शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या स्मिथच्या दमदार खेळींच्या पायावर ग्रीन, कॅरी आणि गोलंदाज धावांचा डोंगर रचायला तयार आहेत. आपल्याविरुध्द अकरा नंबरचा फलंदाजही डॉन ब्रॅडमन बनतो. 2015-16 च्या पावसात वाहून गेलेल्या बंगळुरू कसोटीनंतर आठ वर्षांनी भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली. भारताच्या या दोन चुकांनी या अल्टिमेट टेस्टचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियानेसर केला आहे. आजच्या सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला तरच भारताला सामन्यात परतायची अंधुक संधी आहे. (WTC Final 2023)

हेही वाचा;

Back to top button