बावडा : जूनच्या पहिल्या आठवड्यात गावोगावी वाढदिवसांची धूम | पुढारी

बावडा : जूनच्या पहिल्या आठवड्यात गावोगावी वाढदिवसांची धूम

राजेंद्र कवडे-देशमुख

बावडा (पुणे) : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गावोगावी वाढदिवसांची धूम पाहायला मिळाली. गुरुजनांच्या आशीर्वादामुळे एकाच कुटुंबामध्ये एकाच वेळी अनेकांचे वाढदिवस साजरे झाले. वर्षातील सर्वाधिक वाढदिवस जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साजरे झाले. या शासनपुरस्कृत वाढदिवसांमुळे ’सोशल मीडिया’ देखील आठवडाभर वाढदिवसमय झाला होता. पूर्वी अशिक्षितांचे प्रमाण जास्त असल्याने कुटुंबातील जन्मलेल्या मुलांच्या तारखा लिहून ठेवल्या जात नसत. त्यामुळे मुलांना शाळेत घालताना जन्मतारखा अनेक वडिलांना माहीत नसल्यामुळे गुरुजी हे सहा वर्षे पूर्ण झाल्याचे दाखविण्यासाठी जून महिन्यातील जन्म झालेल्या तारखा दाखवत असत.

जून महिना सोडून इतर महिन्यांतील तारखा टाकण्याचा त्रासही त्या वेळेचे शिक्षक घेत नसत. त्यामुळे अनेकांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जन्मतारीख 1 जून व जूनच्या पहिल्या आठवड्यातील तारीख टाकलेली असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात वाढदिवस असणार्‍यांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. त्यामुळे विशेषतः 1 जूनला सर्वांना शुभेच्छा देताना राजकीय नेतेमंडळी, मित्रमंडळींची, नातेवाइकांची त्रेधातिरपीट उडाली. फुलवाल्यांकडून हारांची चांगली विक्री झाली, तर केकची मोठ्या संख्येने विक्री झाली. 1 जून आपली खरी जन्मतारीख नाही, तरीही आपणास वाढदिवस साजरा करावा लागत आहे, अशी खंत बहुतांश सत्कारमूर्तींनी बोलून दाखवली व तशी त्यांच्या चेहर्‍यावरही दिसत होती.

विशेष म्हणजे, अनेक कुटुंबांमध्ये दोन भावांचे तसेच कुटुंबातील इतर सदस्यांचे व भावकीतील अनेकांचे वाढदिवस जूनच्या पहिल्या आठवड्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणी गावातील पाच-दहा जणांचे एकत्रितपणे वाढदिवस साजरे करण्यात आले. परिणामी घराघरांत, वाड्या-वस्त्यांवर, गावागावांत मोठ्या संख्येने वाढदिवस साजरे करण्यात आले. उन्हाळा असूनही उत्साही वातावरणात वाढदिवसानिमित्त जेवणावळी झाल्या तसेच फटाके फोडण्यात आले.

पूर्वी कधीही वाढदिवस साजरे न केलेल्यांना आता नाइलाजाने का होईना कुटुंबीयांच्या, मित्रमंडळींच्या आग्रहाखातर वाढदिवस साजरे करावे लागत आहेत. बदल हा निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे आम्हालाही बदलावे लागत असून, मनामध्ये नसतानाही आग्रहाखातर वाढदिवसानिमित्त केक कापावे लागत असल्याची खंत वाढदिवस साजरा झालेल्या काही ज्येष्ठ नागरिकांनी दिली. दरम्यान, वाढदिवसांमुळे एकमेकांप्रती आदर, प्रेम, त्याचबरोबर सामाजिक एकोपा निर्माण होत असल्याचे सकारात्मक चित्रही दिसून आले.

हेही वाचा

बारामतीत कोरड उसाला अन् पाणी ओढ्याला!

उरुळी कांचन : पळून जाताना वाहनाने उडवले; बसचालकाचा मृत्यू

Back to top button