उरुळी कांचन : पळून जाताना वाहनाने उडवले; बसचालकाचा मृत्यू | पुढारी

उरुळी कांचन : पळून जाताना वाहनाने उडवले; बसचालकाचा मृत्यू

उरुळी कांचन(पुणे) : पुढारी वृत्तसेवा : वाहनाला कट मारला म्हणून लोक मारतील म्हणून पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या आराम बसच्या चालकाला अज्ञात वाहनाने उडविल्याने जागीच मृत्यू झाला. पुणे – सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत साखरे पेट्रोल पंप परिसरात बुधवारी (दि. 7) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

दत्ता मोरे, (वय 45, रा. गोफणी, जिल्हा लातूर) असे मृत चालकाचे नाव आहे. सोलापूरहून खाजगी आराम बस घेऊन चालक दत्ता मोरे पुण्याकडे चालले होते. पहाटेच्या वेळी त्यांच्या बसने यवत हद्दीत महामार्गावरील वाहनांना कट मारला, त्यामुळे आपला पाठलाग कोणीतरी करीत आहे, म्हणून घाबरून बसचालक मोरे यांनी बस तशीच पळवून उरुळी कांचन येथील साखरे पेट्रोलपंपासमोर उभी केली. नंतर ते रस्ता दुभाजक ओलांडून पळून जाण्याचा प्रयत्न करताना मोरे यांना एका खासगी वाहनाने टक्कर दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

लोणीकाळभोर हद्दीत पुणे -सोलापूर महामार्गावर परप्रांतीय अथवा जिल्ह्याबाहेरील प्रवासी अथवा वाहनचालकांना किरकोळ कारणांनी रस्त्यावर ओढून मारहाण करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. छोटे नुकसान झाले तरी मोठी लूट केली जाते. वाहनचालक व प्रवाशांनी अनेकवेळा तक्रारी करूनही पोलिसांचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.

हेही वाचा

पुण्यातील आधार केंद्र बंद असल्याने नागरिकांचे हाल

WTC Final : खेळपट्टीचे स्वरूप पाहूनच अश्विनला संघाबाहेर ठेवले : रोहित शर्मा

पालखी महामार्ग मृत्यूचे सापळे : पुरंदरमध्ये वारीची वाट रखरखत्या उन्हातच

Back to top button