पालखी महामार्ग मृत्यूचे सापळे : पुरंदरमध्ये वारीची वाट रखरखत्या उन्हातच | पुढारी

पालखी महामार्ग मृत्यूचे सापळे : पुरंदरमध्ये वारीची वाट रखरखत्या उन्हातच

समीर भुजबळ

वाल्हे(पुणे) : आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदीहून पंढरपूरकडे 12 जूनला प्रस्थान होत आहे. दिवे घाट ते नीरा या 50 किलोमीटर पालखी मार्गावरील चौपदरीकरण संथगतीने सुरू असून, झाडांची कत्तल झाल्यामुळे यंदा वारकर्‍यांना रखरखत्या उन्हातून पायी वारी करावी लागणार आहे. धोकादायक ब्लॅक स्पॉटला दररोज अपघात घडत आहेत. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाल्याने वाहनचालकांसह प्रवाशांचे जीव जातायेत.

संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींचा पायी पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातून 14 ते 18 जून या पाच दिवसांत मार्गस्थ होणार आहे. तालुक्यातील पालखी मार्गावर पूर्वी जुनी व मोठी सावलीची झाडे होती. झाडांच्या मोठ्या प्रमाणावर पडणार्‍या सावलीत वारकरी विसावा घेत होते. परंतु, गेल्या वर्षापासून मार्गाचे रुंदीकरण सुरू झाल्याने मार्गावरील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. त्यामुळे पालखी मार्गावर सध्या सावली राहिलेली नाही. पायी चालताना थोडावेळ उसंती घ्यायची असल्यास सावली शोधून सापडणार नाही. तर, वारकर्‍यांना पूर्णपणे उन्हात तापलेल्या मार्गावर पायी चालावे लागणार आहे.

जेजुरी औद्योगिक वसाहत ते नीरा या दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर, पण संतगतीने सुरू आहे. या मार्गावर अनेक वर्षांपूर्वीची जुनी झाडे होती. दौंडज खिंड ते पिसुर्टी कमानीपर्यंत पालखी मार्गाचे रुंदीकरण सुरू करताना जुन्या रस्त्याच्या कडेची सर्वच्या सर्व झाडे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे भविष्यात पालखी मार्ग रुंद होईल, पण किमान दहा वर्षे तरी या पालखी मार्गावर सावलीची झाडे येणे अशक्य असल्याचे वृक्षप्रेमी बोलत आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जेजुरीच्या मुक्कामानंतर दुसर्‍या दिवशी वाल्हेकडे मार्गस्थ होताना दौंडज खिंडीत सकाळच्या न्याहरीसाठी विसावतो. या परिसरातील जुने वटवृक्ष, पिंपळसह अगदी छोटी बोराची झाडे ही काढल्याने विसावा स्थळ भकास झाले आहे. शिवाय, या ठिकाणी सुरू असलेले रेल्वेचे लोहमार्गावर विस्तारीकरण व पालखी महामार्ग रुंदीकरण यामुळे मातीचे भराव टाकल्याने सोहळ्याच्या न्याहरीसाठी अडचण निर्माण होणार आहे.

हेही वाचा

पुणे : प्रदेशाध्यक्षांसमोर काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर

पुणे : प्रदेशाध्यक्षांसमोर काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर

पुणे : माउंट एव्हरेस्ट मोहिमेस गेलेल्या स्वप्निल गरड यांचा मृत्यू

Back to top button