Nashik : माझी वसुंधरा स्पर्धेत शिरसाटे ग्रामपंचायत राज्यात प्रथम | पुढारी

Nashik : माझी वसुंधरा स्पर्धेत शिरसाटे ग्रामपंचायत राज्यात प्रथम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पंचतत्त्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकासासाठी सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा ३.०’ २०२२-२३ स्पर्धेतील मानकऱ्यांना मुंबईत पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्र्याच्या हस्ते गौरविण्यात आले. या अभियानात सलग तिसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीय बक्षीस मिळविले असून, यावर्षी तीन ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला.

इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम, तर नाशिक तालुक्यातील शिंदे व निफाड तालुक्यातील विंचूर ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या गटांत राज्यात तृतीय क्रमांक मिळविला. तसेच अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचाही सन्मान करण्यात आला.

माझी वसुंधरा अभियान सुरू झाल्यापासून यात राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये नाशिक जिल्ह्याचा नावलौकिक राहिला आहे. पहिल्या वर्षी निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला, तर दुसऱ्या वर्षी याच ग्रामपंचायतीने पुन्हा राज्यात प्रथम क्रमांक, तर निफाड तालुक्यातील चांदोरी व इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय पुरस्कार मिळविला होता. अभियानाच्या या तिसऱ्या वर्षी जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली असून, पर्यावरणपूरक गाव करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यावर्षी शिरसाटे (इगतपुरी), विंचूर (निफाड) आणि शिंदे (नाशिक) या ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केला आहे.

लोकसंख्या दोन ते पाच हजार गटात शिरसाठे ग्रामपंचायत राज्यात प्रथम आली असून, लोकसंख्या पाच ते दहा हजार गटात शिंदे ग्रामपंचायत तृतीय, तर लोकसंख्या 10 हजारांपेक्षा जास्त गटात विंचूर तृतीय आली आहे. भूमी घटकाबाबत असलेल्या विशेष पुरस्कारामध्ये शिरसाटे गावाला पुरस्कार मिळाला आहे.

राज्य शासनाच्या वतीने पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वाच्या आधारे राबविण्यात येत असलेल्या या अभियानात नाशिक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. एप्रिल महिन्यात सर्व ग्रामपंचायतींची कामे शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. या कामांची डेस्कटॉप पडताळणी शासनाकडून करण्यात आली. यानंतर निवडक ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष पडताळणी शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेच्या वतीने करण्यात आली.

आज पर्यावरण दिनानिमित्त मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रम वितरण सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, डॉ. वर्षा फडोळ, शिंदे ग्रामपंचायतीचे सरपंच गोरख जाधव, ग्रामसेवक सुरेश भोजने, शिरसाटे ग्रामपंचातीचे सरपंच गोकुळ सदगीर, ग्रामसेवक हनुमान दराडे, विंचूरचे ग्रामविकास अधिकारी ग्यानदेव खैरनार, जिल्हा कक्षातील सल्लागार रवींद्र बाराथे, हर्षल देसाई उपस्थित होते.

जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब : मित्तल

माझी वसुंधरा अभियानात सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्याला तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. जिल्ह्यात पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी व पर्यावरणसमृद्ध गाव करण्यासाठी लोकसहभागातून चांगली कामे करण्यात आली आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामेदेखील करण्यात येत आहेत. अभियानासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींना या अभियानात करावयाच्या कामांविषयी माहिती तसेच नियेाजन करून देण्यात आले. सर्व गावांचे ‘गाव कृती आराखडे’ तयार करून त्यानुसार अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button