पिंपरी : पोहण्यासाठी मोजा वीस रूपये; पालिका जलतरण तलावांच्या तिकीट, पासदरात दुप्पटीने वाढ | पुढारी

पिंपरी : पोहण्यासाठी मोजा वीस रूपये; पालिका जलतरण तलावांच्या तिकीट, पासदरात दुप्पटीने वाढ

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वजनिक 13 जलतरण तलावाचे तिकीट व पास दर दुप्पटीने वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे आता 45 मिनिटे पोहण्यासाठी 10 रूपयांऐवजी 20 रूपये मोजावे लागणार आहेत. तसेच, मासिक, तिमाही व वार्षिक पास दरातही मोठी वाढ करण्यात आली आहे. जलतरण तलावातून मिळणारे उत्पन्न कमी असून, तलावावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. क्रीडा विभागास तलावावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असल्याने तलावाचे तिकीट व पास दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरवाढीस आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.

पोहण्याची एक बँच 45 मिनिटांची असते. त्यासाठी आता 20 रूपये मोजावे लागणार आहेत. हे तिकीट ऑनलाइन आदल्या दिवसांपर्यंत काढावे लागते. अन्यथा तलावावर प्रवेश दिला जात नाही. तसेच, 12 ते 60 वयोगटांतील सर्व नागरिकांना एका महिन्याच्या पाससाठी 400 ऐवजी 500 रूपये खर्च करावा लागणार आहे. तर, तीन महिन्यांसाठी 700 ऐवजी 1 हजार 200 रूपये दर आहे. वर्षभराच्या पाससाठी 1 हजारऐवजी 4 हजार 500 रूपये भरावे लागणार आहेत. लॉकर फी तीन महिन्यांसाठी 50 ऐवजी 300 रूपये व वर्षासाठी 100 ऐवजी 1 हजार 200 रूपये असणार आहे.

महापालिकेचे 13 जलतरण तलाव :

प्राधिकरण, निगडीतील छत्रपती शिवाजी महारात तलाव, संभाजीनगरातील साई अ‍ॅक्वामरीन तलाव, मोहननगरातील राजर्षी शाहू महाराज तलाव, केशवनगरातील बाळासाहेब गावडे तलाव, नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम तलाव, भोसरीतील बाळासाहेब लांडगे तलाव, वडमुखवाडीतील संत ज्ञानेश्वर महाराज तलाव, यमुनानगर येथील तलाव, थेरगाव येथील खिंवसरा पाटील तलाव, पिंपरी गावातील तलाव, सांगवीतील बाळासाहेब शितोळे तलाव, कासारवाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव, पिंपळे गुरव येथील काळूराम जगताप तलाव.

शुल्क दरवाढीस आयुक्तांची मंजुरी

जलतरण तलावातून मिळणारे उत्पन्न व त्यावर होणार खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. ही तफावत कमी करण्यासाठी जलतरण तलाव शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवाढीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला होता. त्याला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे. जून 2014 नंतर म्हणजे सात वर्षांनंतर प्रथमच ही दर वाढविण्यात आले आहेत, असे क्रीडा विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.

ठेकेदारांच्या भल्यासाठी दरवाढीचा निर्णय?

महापालिकेचे 13 पैकी 6 जलतरण तलावांचे खासगीकरण करण्यात येत आहे. तिकीटदर कमी असल्याने त्याला प्रतिसाद नाही. त्यामुळे फेरनिविदा काढण्यात आली आहे. ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तलाव चालविण्यासाठी घेणार्‍या ठेकेदारांनी तिकीट व पास दरवाढ करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार क्रीडा विभागाने तिकीट व पास दरामध्ये मोठी वाढ केली आहे. तिकीट दर वाढविल्याने ठेकेदार एजन्सीचे उत्पन्न आपोआप दुप्पटीपेक्षा अधिक होणार आहे. ठेकेदारांच्या भल्यासाठी दरवाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

1स्पर्धा, सराव, शिबिरासाठी शाळा, महाविद्यालय, कंपनी, क्लब यांना नेहरूनगर तलावाचे एका तासाचे भाडे 2 हजार रूपये असणार आहे. उर्वरित 12 तलावाचे भाडे 1 हजार 500 रूपये आहे. 2बारा वर्षाखालील मुले व मुली, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय खेळाडू, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक यांना मासिक, तिमाही व वार्षिक पाससाठी 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. मात्र, दैनंदिन तिकीटात कोणतीही सवलत मिळणार नाही. त्यांना वीस रूपयांचे ऑनलाइन तिकीट घ्यावे लागणार आहे. 3नगरसेवक, खेळाडू दत्तक योजनेतील जलतरण खेळाडू, पालिका शाळेचे विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांग नागरिक यांना पोहण्यासाठी मोफत प्रवेश असणार आहे. त्यांना तिकीट किंवा पास काढावा लागणार नाही.

हेही वाचा

जयप्रभा स्टुडिओ प्रकरणी सरकारने अहवाल मागवला

Afghanistan News : अफगाणिस्तानात 80 विद्यार्थिनींना पाजले विष

अहमदनगरमध्ये उरूस मिरवणुकीत झळकले औरंगजेबाचे फोटो

Back to top button