सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दर्जा घसरला ! | पुढारी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दर्जा घसरला !

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशातील शैक्षणिक संस्थांचा दर्जा ठरविणारे नॅशनल इस्टिट्युशनल रॅंकिंग फ्रेमवर्क अर्थात एनआयआरएफ रॅंकिंग सोमवारी सकाळी जाहीर करण्यात आले. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाची ओव्हरऑल रँकिंगमध्ये ३५ व्या तर विद्यापीठांच्या गटात १९ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा घसरला असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग यांनी 2023 चे एनआयआरएफ रँकिंग जाहीर केले. देशातील सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठांच्या वर्षभरातील कामगिरीच्या आधारे शिक्षण मंत्रालयाकडून हे रॅंकिंग दिले जाते.

देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मागील वर्षी विद्यापीठ ओव्हरऑल गटात २५ व्या स्थानावर होते. २०२० मध्ये विद्यापीठ गटात नवव्या क्रमांकावर असलेल्या विद्यापीठाची ही घसरण चिंता वाढवणारी आहे. विद्यापीठाला एकूण सरासरी ५८.३१ गुण मिळाले आहेत. तर ओव्हरऑल गटात ५५.७८ गुण आहेत. २०१६ मध्ये एनआयआरएफला सुरूवात झाली. त्यावर्षी केवळ साडे तीन हजार शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला होता. यावर्षी हा आकडा ८ हजार ६८६ एवढा आहे. देशात इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मद्रासने ओव्हरऑल रँकिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

मागील तीन वर्षांपासून विद्यापीठाची क्रमवारी दरवर्षी घसरत चालली आहे. विद्यापीठ गटात २०२० मध्ये नऊ क्रमांकावर असलेले विद्यापीठ मागीलवर्षी १२ व्या क्रमांकावर होते. तर २०२१ मध्ये अकरावे स्थान मिळाले होते. त्यावेळी एकूण ५८.३४ एवढे होते. सर्व शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ देशात ३५ व्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी हा क्रमांक २५ वा होता.

क्रमवारी ठरविताना देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, अभियांत्रिकी, महाविद्यालये, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय, दंत वैद्यकीय, विधी, अर्किटेक्चर आणि कृषी असे एकूण १२ गट केले आहेत. हा दर्जा ठरविण्यासाठी संशोधन, सर्वसमावेशकता, पदवीधर विद्यार्थ्यांचे निकाल आणि संख्या आणि शिकविणे, शिकणे आणि संसाधने असे काही निकष ठरविले आहेत.

विद्यापीठाचे मागील पाच वर्षांचे रँकिंग…

वर्ष        सर्वसाधारण गट     विद्यापीठ गट

२०१९           १७                         १०

२०२०           १९                          ९

२०२१           २०                         ११

२०२२         २५                           १२

२०२३         ३५                           १९

हेही वाचा

Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातातील १५१ मृतांची ओळख पटली

परिवहन विभागात येणार 187 इंटरसेप्टर वाहने

सोनई : नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत करा : आ शंकरराव गडाख

Back to top button