वाल्हे : दिवे घाट धोकादायक, अपघातांची मालिका; महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

वाल्हे : दिवे घाट धोकादायक, अपघातांची मालिका; महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष

समीर भुजबळ

वाल्हे (पुणे) : पुणे-निरा या पालखी मार्गावर अनेक ठिकाणी मृत्यूचे सापळे (ब्लॅक स्पॉट) तयार झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने येथे आजपर्यंत अनेक अपघात घडले आहेत, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पुण्याकडून दिवे घाट चढताना, घाटाच्या दुसर्‍या चढाला जड वाहनांचा वेग नियमित मंदावतो, तर उताराने येणार्‍या जड वाहनांना वळणाचा अंदाज येत नाही. नुकताच रसायनाने भरलेला एक टँकर येथे अपघातग्रस्त झाला होता. यात दोघांचा निष्पाप जीव गेला होता.

दिवे घाटाच्या मध्यावर दोन ठिकाणी अवघड वळणे आहेत. मागील वर्षी संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यात भरधाव वाहन घुसले होते. या दुर्घटनेत नामदेव महाराजांच्या वंशजांचा अपघाती मृत्यू झाला होता. तसेच घाटावरील विसाव्यासमोर अचानक रस्ता मोठा आहे. दुहेरी रस्त्यावरून चौपदरी रस्त्यावर जाताना किंवा येताना नेहमी अपघात होतात.

दिवे शासकीय आयटीआय ते पवारवाडी कॉर्नर या भागातील रस्ता तर अत्यंत धोकादायक आहे. आजोबा व नातूचा मागील काही महिन्यांपूर्वीच या ठिकाणी अपघाती मृत्यू झाला होता. पवारवाडी ओढ्यावरील पुलाचे अर्धवट काम झाले असून, पुण्याच्या बाजूने येताना रात्रीच्या वेळी खालच्या पुलावरून जाताना रस्ता धोकादायक आहे. तर पावसाळ्यात या पुलावर पाणी येते. या पुलाला सुरक्षेची बॅरीकेट लावलेली नाहीत. सासवड शहरात येण्याआधी चंदन टेकडी भाग व हिवरकर मळा येथील वळण धोकादायक आहे. या भागात एक भरधाव कंटेनर पेट्रोल पंपात शिरला होता.

Back to top button