मंगळावरून यू ट्यूबवर प्रथमच लाईव्ह स्ट्रिमिंग

पॅरिस : युरोपची अंतराळ संशोधन संस्था ‘इसा’ने प्रथमच यू ट्यूबवर मंगळावरून लाईव्ह स्ट्रिमिंग केले आहे. या स्ट्रिमिंगची ऐतिहासिक लाईव्ह छायाचित्रेही समोर आली आहेत. या लाल ग्रहाला जवळून पाहण्याची थेट संधी यानिमित्ताने लोकांना मिळाली. या छायाचित्रांना ‘इसा’ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. हॅशटॅग ‘मार्सलाईव्ह’सह पोस्ट केलेल्या या छायाचित्रांमुळे मंगळाची एक झलक लोकांना पाहायला मिळाली.
युरोपियन अंतराळ संशोधन संस्थेने मार्स एक्स्प्रेस ऑर्बिटरच्या लाँचला वीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हे लाईव्ह स्ट्रिमिंग केले. या मोहिमेचा उद्देश मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाची त्रिमितीय छायाचित्रे आणखी तपशीलासह मिळवणे हा होता. जर्मनीच्या डार्मस्टेडमधील ‘इसा’च्या मिशन कंट्रोल सेंटरवरील जेम्स गॉडफ्रे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की सर्वसाधारणपणे आपण मंगळ ग्रहाची जी छायाचित्रे पाहतो ती पुष्कळ आधी टिपलेली असतात. मात्र, आता आपण ‘रियल टाईम’मध्ये या ग्रहाला पाहू शकतो. त्यामुळे जितके शक्य होईल तितके आपण या ग्रहाजवळ राहू शकतो.
अंतराळातून फोटो येणे या गोष्टीवर अवलंबून असते की मंगळ आणि पृथ्वी सूर्याभोवतीच्या आपल्या कक्षेत कुठे आहेत. अशावेळी अंतराळातून प्रवास करणार्या संदेशाला तीन ते 22 मिनिटांच्या वेळेपर्यंत कुठेही पाठवता येऊ शकते. ‘इसा’ने अनुमान लावले होते की मंगळावरून पृथ्वीवर थेट प्रवास करण्यासाठी फोटोग्राफ्स तयार होण्यास सुमारे 17 मिनिटे लागतील आणि पुन्हा लाईव्ह स्ट्रिम सुरू करण्यासाठी पृथ्वीवर तारा आदि सर्व्हर्सच्या माध्यमांतून एक आणखी मिनिट लागेल.