BJP TDP Alliance : अमित शहांचे चंद्राबाबू नायडूंसोबत विचारमंथन, भाजप-टीडीपीच्या युतीची दाट शक्यता

BJP TDP Alliance : अमित शहांचे चंद्राबाबू नायडूंसोबत विचारमंथन, भाजप-टीडीपीच्या युतीची दाट शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय रथ रोखण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधकांना एकत्र करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्याचवेळी, भारतीय जनता पक्ष (भाजप) देखील याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते. गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.

भाजप आणि त्यांचा माजी मित्र पक्ष टीडीपी यांच्यात संभाव्य युतीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर बैठक केल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, शहा आणि नायडू या नेत्यांनी आंध्र प्रदेशात एकत्र येण्याच्या शक्यतेवर चर्चा केल्याचे समजते आहे. येथे चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. शिवाय तेलंगणातही टीडीपीसोबत भाजप एकत्र येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भाजप नेतृत्वाने तेलंगणाला त्यांच्या 'मिशन दक्षिण' मोहिमेचे केंद्रस्थान बनवले आहे. त्यातच या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर विशेष दर्जाच्या मागणीवरून 2018 चंद्राबाबू नायडू यांनी भाजपपासून फारकत घेतली. आता ते अगामी लोकसभा निवडणुकीत यश मिळवण्याच्या हेतून पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याची तयारी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे टीडीपी आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी युती होऊ शकते अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. परंतु भाजपच्या राज्य युनिटच्या काही नेत्यांनी टीडीपीला सोबत घेण्यास विरोध केला आहे. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही पक्षांमधील संबंध बिघडले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नायडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून काँग्रेसबद्दल कळकळ व्यक्त केली होती, त्यामुळे त्यांना भाजप सोबत घेऊ नये असे काही नेत्यांचे म्हणणे आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप नेतृत्वाचे लक्ष दक्षिण भारतातील इतर राज्यांवर विशेषत: आंध्र प्रदेश आणि तेलंगणाकडे लागले आहे. इथे कोणत्याही किंमतीत काँग्रेसला कमबॅक करण्याची संधी द्यायची नाही, यासाठी भाजप जोरदार प्रयत्नशील असेल असेही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

यापूर्वी अमित शहा यांना टीडीपीसोबत युतीच्या शक्यतेबाबत विचारण्यात आले होते, पण त्यांनी ते वृत्त नाकारले होते. मात्र गेल्या वर्षभरापासून चंद्राबाबू नायडू यांनी अनेकवेळा दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांची भेट घेतली आहे. ते पंतप्रधान मोदी यांणाही भेटले होते. त्यातच गेल्या वर्षीच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना टीडीपीने पाठिंबा दिला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news