प्रेमात लैंगिक अत्याचाराचा अधिकार नाही! मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय | पुढारी

प्रेमात लैंगिक अत्याचाराचा अधिकार नाही! मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : पाच-सहा महिन्यांच्या प्रेमसंबंधांनंतर शेजारी राहणाऱ्या तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला मुंबई सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला. तरुणीबरोबर प्रेमसंबंध आहेत, म्हणजे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, असे स्पष्ट करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. पी. शर्मा यांनी नराधम आरोपी मोहम्मद शमशे आलम मोहम्मद बद्रुलहक शेख याला दोषी ठरवून साडेतीन वर्षांचा सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

गोवंडी-शिवाजीनगर येथील आरोपी मोहम्मद शमशे आलम मोहम्मद बद्रुलहक शेख आणि त्याच्या शेजारी राहणारी पीडिता कुंदा (नाव बदलले आहे.) यांचे पाच-सहा महिने प्रेम प्रकरण सुरू होते. दोघांच्या प्रेमसंबंधाला तरुणीच्या घरच्यांचा विरोध होता. त्या पार्श्वभूमीवर आरोपीने १५ ऑगस्ट २०१७ रोजी बोलायचे आहे, असे सांगून पीडितेला कॉल करून बोलावून घेतले. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडिता एका वर्कशॉपमध्ये आली. तिथे आल्यानंतर आरोपीने तिच्या मर्जी विरोधात लैंगिक कृत्य करण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडितेने हा सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीसांनी आरोपीला त्याच दिवशी अटक केली. त्यानंतर कुंदाशी विवाह करण्याची तयारी दर्शविल्यानंतर न्यायालयाने फेब्रुवारी २०१९ रोजी आरोपीची जामिनावर सुटका केली.

खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना आरोपी आणि पीडिता या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दोघांनी विवाह केला असल्याने शिक्षा माफ करावी, अशी विनंती करण्यात आली. मात्र न्यायालयाने घटनेच्या वेळी पीडितेने गैरकृत्याचा प्रतिकार करीत स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी आरोपीवर हल्ला केला आहे. या वरुन आरोपीने तिच्यावर बळजबरी केल्याचे दिसून येते. असे स्पष्ट मत व्यक्त करताना सरकारी सामान्य पुरावे विचारात घेऊन आरोपीला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.

Back to top button