खेड-पारगाव शिंगवे राज्यमार्ग व्हावा ! ग्रामस्थांनी घेतली खा. कोल्हे यांची भेट | पुढारी

खेड-पारगाव शिंगवे राज्यमार्ग व्हावा ! ग्रामस्थांनी घेतली खा. कोल्हे यांची भेट

लोणी धामणी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव व खेड तालुक्यांना दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा खेड-पारगाव शिंगवे हा रस्ता राज्यमार्ग व्हावा, अशी मागणी धामणी, शिरदाळे ग्रामस्थांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना केली आहे. डॉ. कोल्हे यांनी याबाबत सकारत्मकता दाखवित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

नारायणगाव (ता. जुन्नर) येथे धामणी, शिरदाळे ग्रामस्थांनी नुकतीच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भेट घेत त्यांना याबाबतचे निवेदन दिले. धामणीच्या सरपंच रेश्मा बोर्‍हाडे, शिरदाळेचे उपसरपंच मयूर सरडे, वसंत जाधव, माजी सरपंच मनोज तांबे, ग्रामपंचायत सदस्य बिपीन चौधरी, सुरेखा रोडे, गणेश तांबे, जयदीप चौधरी, राजेंद्र चौधरी, अजित बोर्‍हाडे आदी या वेळी उपस्थित होते.

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गुळणी, वाफगाव, चिंचबाईवाडी, तर आंबेगावच्या पूर्वेकडील पहाडधरा, शिरदाळे, धामणी, जारकडवाडी, पारगाव शिंगवे ही गावे चांगल्या रस्त्याअभावी तसेच दळणवळणाच्या सोयीसुविधांअभावी कायमच विकासापासून दूर राहिली आहेत. जर खेड-पारगाव शिंगवे हा राज्यमार्ग झाला, तर ही सर्व गावे जोडली जातील. तसेच येथील दळणवळण सुरळीत होत गावांची आर्थिक प्रगती होण्यास मदत होईल.

अंदाजे 25 ते 30 किलोमीटरचा खेड-पारगाव शिंगवे हा रस्ता पुढे अष्टविनायक महामार्ग आणि बेल्हे-जेजुरी मार्गाला जोडला, तर भविष्यात त्याचाही मोठा फायदा होईल, असे धामणी, शिरदाळे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. या संदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील सकारात्मकता दाखवित लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

खेड-पारगाव शिंगवे राज्यमार्ग झाल्यास आंबेगाव व खेड तालुक्यांना जोडणारा हा सोयीचा मार्ग ठरणार आहे. पुढे तो बेल्हे-जेजुरी आणि अष्टविनायक महामार्गाला जोडला जातो. त्यामुळे रस्त्यांपासून वंचित असलेल्या गावांचे दळणवळण सुरळीत होईल आणि त्याचा फायदा गावोगावच्या बाजारपेठांना होईल. या ठिकाणी भविष्यात चांगले उद्योग, व्यवसाय उभे राहून स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होईल.

– मयूर सरडे, उपसरपंच, शिरदाळे.

हेही वाचा 

पळून आलेल्या प्रेमीयुगलांना शोधण्यासाठी बुरखाधारी गावात; मात्र पळापळ झाली जुन्या प्रेमीयुगलांची

जामखेड : विकासकामे करताना विरोधकांना विश्वासात घ्या : आमदार रोहित पवार

‘आप’ची स्वराज्य यात्रा घडवणार बदल, पिंपरी शहरात आज आगमन

Back to top button