जामखेड : विकासकामे करताना विरोधकांना विश्वासात घ्या : आमदार रोहित पवार | पुढारी

जामखेड : विकासकामे करताना विरोधकांना विश्वासात घ्या : आमदार रोहित पवार

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : मागील पाच वर्षांच्या काळात विरोधकांची सत्ता असताना बाजार समिती तोट्यात होती कारण विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त खर्च केला. नंतर अडीच वर्षे प्रशासकाच्या काळात तीन कोटी रुपये नफ्यात आली. या पैशाचा चांगला वापर करा. शेतकरी, व्यापारी, हमाल यांच्या हिताचे निर्णय घ्या.

विकासकामे करताना विरोधकांना विश्वासात घ्या, असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी बाजार समिती पदाधिकार्‍यांना दिला. बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांचा पदग्रहण समारंभ तसेच संचालकांचा सत्कार आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्या वेळी ते बोलत होते. आमदार पवार यांनी पंचवीस लाख रुपयांचा आमदार निधीही या वेळी बाजार समितीसाठी दिला.

जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, सुधीर राळेभात, संचालक अंकुशराव ढवळे, सतीश शिंदे, गजानन शिंदे, विठ्ठल चव्हाण, सुरेश पवार, राहुल बेदमुथ्था, नारायण जायभाय, रमेश आजबे, शिवाजी डोंगरे, दादा उगले, सरपंच हनुमंत पाटील, शरद शिंदे, सुरेश भोसले, भारत काकडे, भरत काळे, त्रिंबक कुमकटकर, प्राचार्य युवराज मुरूमकर, कांतीलाल वराट, हरिभाऊ मुरूमकर, भरत लहाने, पोपट वराट, युवराज वराट, नानासाहेब लहाने, विष्णू लहाने, अशोक मुरूमकर आदी उपस्थित होते.

आमदार पवार म्हणाले, की बाजार समिती निवडणुकीत झाले ते झाले. आता सर्वांना विश्वासात घेऊन विकासकामे करा. शेतकरी, व्यापारी, हमाल यांच्यासाठी काय काय करायचे याचे नियोजन करा. निधीची कसलीही अडचण येणार नाही, यासाठी मी कटिबद्ध आहे.
पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका व विधानसभा निवडणुकीत काय होणार हे मला माहीत आहे.

त्याची कोणीही काळजी करू नये. विरोधक फक्त 2024 पर्यंत खूश राहणार आहेत. आदर्श बाजार समिती करण्यासाठी काय काय करता येईल ते सर्व करा. सुधीर राळेभात म्हणाले, की शेतकरी केंद्रबिंदू मानून सर्व निर्णय घेण्यात येतील. कोणतीही गोष्ट चुकीची होऊ देणार नाही. शेतकरी व्यापारी हमाल यांना पूर्णपणे संरक्षण देऊ कोणालाही त्रास होणार नाही. कैलास वराट म्हणाले, की एका सर्वसामान्य व्यक्तीला आमदार रोहित पवार व अमोल राळेभात यांनी संधी दिली आहे. सभापती पदग्रहण समारंभात डॉ. भगवान मुरूमकर यांनी वराट बंधूंवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना, ‘डॉ. मुरूमकर यांनी आत्मपरीक्षण करावे,’ असे वराट म्हणाले.

Back to top button