पिंपरी: पुनावळेकरांना कोंडीमुक्त करण्यासाठी उड्डाणपूल उभारा, भाजपाचे नवनाथ ढवळे यांची मागणी | पुढारी

पिंपरी: पुनावळेकरांना कोंडीमुक्त करण्यासाठी उड्डाणपूल उभारा, भाजपाचे नवनाथ ढवळे यांची मागणी

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: ताथवडे-पुनावळे गावांना जोडणार्‍या भुयारी मार्गात मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महामार्गावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी भाजपाचे शहर उपाध्यक्ष नवनाथ ढवळे यांनी केली आहे. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत असलेल्या पुनावळे आणि ताथवडे गावच्या हद्दीतून महामार्ग गेला. त्यामुळे दोन्ही गावाची विभागणी झाली आहे. या दोन गावांना जोडण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्यात आला. मात्र, त्या वेळी असलेली लोकसंख्या आणि वाहतुकीवरून भुयारी मार्गाची उंची आणि रुंदी ठरवण्यात आली. सध्या या दोन्ही गावांचा कायापालट झाला आहे. टोलेजंग इमारतींमुळे गावाला शहराचे स्वरूप आले आहे.

वाढत्या रहदारीमुळे भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तसेच, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशा उपाययोजना नसल्याने थोड्या पावसातही भुयारी मार्गात तळे साचून वाहतूक ठप्प होते. याचा मोठा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रारी करण्यात आल्या आहे. मात्र, अद्याप कोणत्याही ठोस स्वरूपाच्या उपायोजना झाल्या नसल्याचे ढवळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे.

अश्विनी जगताप यांचे गडकरींना साकडे

महामार्गावर उड्डाणपूल उभारून ताथवडे-पुनावळे येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार अश्विनी जगताप यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची नुकतेच भेट घेतली. गडकरी यांनीदेखील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे जगताप यांच्या समर्थकांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा:

‘आप’ची स्वराज्य यात्रा घडवणार बदल, पिंपरी शहरात आज आगमन

पिंपरी : दुकानदारांना आरक्षित भूखंड देण्यास पीएमआरडीएकडून टाळाटाळ

Migraine | डोकेदुखीकडे नका करू दुर्लक्ष, मायग्रेनचा त्रास तर नाही ना? जाणून घ्या कारणे आणि उपाय

 

Back to top button