कोल्हापुरात उद्या पहिले नांगरट साहित्य संमेलन | पुढारी

कोल्हापुरात उद्या पहिले नांगरट साहित्य संमेलन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्थेच्या वतीने पहिले नांगरट साहित्य संमेलन रविवारी (दि. 4) होणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषा भवनाच्या सभागृहात होणार्‍या संमेलनात दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

रविवारी सकाळी नऊ वाजता प्रसिद्ध वात्रटिकाकार व साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक, कवी डॉ. विठ्ठल वाघ संमेलनाध्यक्ष असून माजी खासदार राजू शेट्टी स्वागताध्यक्ष आहेत. या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या उद्घाटन सत्रात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. डॉ. जाधव यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे व ज्येष्ठ शेतकरी नेते वामनराव चटप यांचाही यावेळी गौरव करण्यात येणार आहे.

दुपारी एक ते साडेतीन या वेळेत दुसर्‍या सत्रात शेतकरी प्रश्नांचे कला, साहित्य, माध्यमे व राजकारण यात उमटलेले प्रतिबिंब या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असतील. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विजय चोरमारे, माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे तसेच प्रा. जालंदर पाटील सहभागी होणार आहेत.

दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेपाच या तिसर्‍या सत्रात कवी संमेलन होणार आहे. मंगळवेढ्याचे सुरेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या सत्रात राज्यभरातील 18 कवी सहभागी होणार आहेत. यानंतर संमेलनाची सांगता होणार आहे. संमेलनाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Back to top button