अंटार्क्टिकाच्या जीवघेण्या थंडीत राहतात 4 हजार लोक! | पुढारी

अंटार्क्टिकाच्या जीवघेण्या थंडीत राहतात 4 हजार लोक!

वॉशिंग्टन ः अंटार्क्टिका हा खंड म्हणजे पृथ्वीवरील सर्वात थंड जागा. दक्षिण ध—ुवावरील या खंडावरील तापमान उणे 98 अंश सेल्सिअसपर्यंतही घसरत असते. हे ठिकाण अगदीच निर्जन असेल असा आपला समज होऊ शकतो. मात्र, संशोधनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांचे अनेक लोक या ठिकाणीही राहत असतात. हाडे गोठवणारी थंडी आणि कोरडी हवा असलेल्या या प्रदेशात सुमारे चार हजार लोक राहतात!

अंटार्क्टिकामध्ये राहणारे संशोधक संबंधित देशांच्या सायंटिफिक रिसर्च स्टेशनमध्येच राहतात. एक वर्ष किंवा पंधरा महिन्यांमध्ये एकदा एखादे जहाज त्यांना सोडण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी याठिकाणी येत असते. जगभरातील वैज्ञानिक याठिकाणी येत असतात. हा खंड म्हणजे जगातील सर्वच देशांची सामूहिक संपत्ती आहे. त्यामुळे या खंडाला ‘द इंटरनॅशनल काँटिनंट’ असेही म्हटले जाते. एका बि—टिश रिसर्च सेंटरमध्ये अडीच वर्षे राहिलेले हवामान वैज्ञानिक अ‍ॅलेक्स गॅफिकिन यांनी सांगितले की अंटार्क्टिकामध्ये हिवाळ्यात सतत अंधार असतो. त्यामुळे याठिकाणी राहणे हे अत्यंत आव्हानात्मक असते.

अर्थात हे वास्तव्य अद्भूतही असते याचे कारण म्हणजे जगात जे पाहायला मिळत नाही, ते या खंडावर पाहायला मिळते. महाकाय सागरी जीव, पेंग्विन कॉलनी आणि अनोखे ग्लेशियर याठिकाणी आहेत. याठिकाणी आम्हाला फ्रोजन फूड किंवा पॅक्ड फूडच खावे लागते, ज्याचा साठा मर्यादित असतो. याठिकाणी जगातील 90 टक्के बर्फ असला तरी पाणीपुरवठाही मर्यादितच असतो. आम्हाला बर्फ वितळवून पाणी घ्यावे लागते. अंटार्क्टिकामध्ये एकूण 66 सायंटिफिक रिसर्च सेंटर्स आहेत.

Back to top button