वारीसाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासन सज्ज: मुख्य कार्यकारी अधिकारी | पुढारी

वारीसाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासन सज्ज: मुख्य कार्यकारी अधिकारी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषद पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी चार प्रकारच्या सुविधा पुरवणार आहे. त्यामध्ये फिरते शौचालये, पाण्याचे टँकर, आरोग्य आणि यावर्षी नव्याने निवाऱ्याचा (मंडप) समावेश आहे. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पालकमंत्र्याच्या सूचनेनुसार पालखी मार्गावर मंडप करण्यात येणार आहेत. मंडपांची संख्या आता 27 वरून 30 करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी दिली.

जिल्हा परिषदेकडून शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलते होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके उपस्थित होते.

वाघमारे म्हणाले, जिल्हा परिषदेकडून होत असलेली कामे प्रगतीपथावर आहेत. काही रस्त्यांची डागडुजी देखील करण्यात येत आहे. गतवर्षी 1 हजार 900 फिरते शौचालये उभारली होती, ती संख्या यावर्षी 2 हजार 700 केली असून परतीच्या मार्गावर चारशे शौचालये देण्यात येणार आहेत. पाणी पुरवठ्यासाठी आत्तापर्यंत शासनाकडून पैसे घेतले जात नव्हते. शासकीय टँकरने पाणी पुरवून डिझेलचा खर्च सेस फंडातून केला जात होता. यावर्षी 106 टँकरने पाणी पुरवठा होणार आहे, त्यामध्ये खासगीही टँकरचा समावेश आहे. यासाठी प्रधान सचिवांनी 1 कोटी 31 लाख रुपयांचा निधी पहिल्यांदा दिला आहे. दोन्ही पालखी मार्गावर दोन किलोमीटर अंतरावर एक याप्रमाणे 87 अतिरिक्त वैद्यकीय पथकांचे नियोजन केले आहे. अतिरिक्त पथकांसह पालखी मार्गावर 146 वैद्यकीय पथके असतील. 140 रुग्णवाहिका उपलब्ध असतील, त्यापैकी 50 श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तर 90 श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर असतील. सध्या पालखी मार्गावरील दोन्हीही बाजूंच्या गावांचे साथरोग विषयक सर्वेक्षण सुरू केले आहे. तसेच एक हजार दिंडीसाठी प्रथमोपचार किटचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मार्गावर एकूण ३० आरोग्यदूतांचे नियोजन करण्यात आले आहे.

मंडपात (निवारा) काय सुविधा असणार…?

पालखी सोहळा सकाळी मार्गस्थ झाल्यानंतर विसाव्या पर्यंत आणि विसावा ते मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत 40 फुट लांब आणि 20 फूट रुंदीचा मंडप उभारण्यात येणार आहेत. याठिकाणी पिण्याच्या पाण्याची टाकी, मंडपाच्या पाठीमागील बाजूस शौचालयाची सुविधा असेल. त्याचबरोबर एका बाजूला 10 बाय 10 आकाराचा हिरकणी कक्ष तयार करण्यात येणार आहे. शिवाय आरोग्य पथकाकडून वारकऱ्यांवर याच ठिकाणी उपचार देखील केले जाणार आहेत.

दिवे घाटात उभारणार आंतर रुग्ण कक्ष…

दिवेघाटाची अवघड चढण चढून आल्यानंतर काही भाविकांना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन यावर्षी जिल्हा परिषदेने वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष सुविधा केली आहे. घाट माथ्यावरील झेंडेवाडी या ठिकाणी विसावा परिसरात १० खाटांच्या विशेष आंतररुग्ण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. या ठिकाणी पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था, पंखा, कुलरची, वैद्यकीय पथक, औषधे, ओआरएस आणि सलाइन सुविधा तयार ठेवण्यात येणार आहेत.

हेही वाचा:

बारामती तालुका दूध संघाची निवडणूक बिनविरोध, राष्ट्रवादीचे संघावर एकहाती वर्चस्व

शिरूरवरून युती अन् आघाडीतही बिघाडी? तिकिटासाठी हायहोल्टेज ड्रामा

वयाच्या तिशीत दोघी बहिणी झाल्या दहावी उत्तीर्ण

 

Back to top button