बारामती तालुका दूध संघाची निवडणूक बिनविरोध, राष्ट्रवादीचे संघावर एकहाती वर्चस्व

बारामती तालुका दूध संघाची निवडणूक बिनविरोध, राष्ट्रवादीचे संघावर एकहाती वर्चस्व

बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या १९ जागांसाठी शुक्रवार २ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १९ च अर्ज दाखल झाले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे दूध संघावर एकहाती वर्चस्व आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार दूध संघाच्या १९ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात विद्यमान संचालक मंडळातील चौघांना संधी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष संदीप जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र रायकर, सतीश पिसाळ व संजय देवकाते या चौघांना नवीन संचालक मंडळात पुन्हा संधी देण्यात आली आहे. याशिवाय यापूर्वी संघावर काम करणाऱ्या प्रशांत खलाटे यांनाही संधी मिळाली आहे. अन्य १४ जागी नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. दूध संघावर दहा वर्षे संचालक असणाऱ्या जुन्यांपैकी कोणालाही यंदा संधी दिली गेली नाही.

सर्वसाधारण मतदार संघातून संदीप हनुमंतराव जगताप (कुरणेवाडी), संजय तुकाराम शेळके (काटेवाडी), प्रशांत दत्तात्रय खलाटे (लाटे), श्रीपती शंकर जाधव (डोर्लेवाडी), संतोष मारुती शिंदे (मुर्टी), दत्तात्रय सदाशिव वावगे (सोनवडी सुपे), शहाजी जिजाबा गावडे (मळद), पोपटराव सोमनाथ गावडे (कऱ्हावागज), संजय रामचंद्र कोकरे (पणदरे), सतीश हरिश्चंद्र पिसाळ (फोंडवाडा- माळवाडी), बापूराव तुकाराम गवळी (उंडवडी सुपे),नितीन विश्वास जगताप (वाकी), किशोर भगवान फडतरे (सिद्धेश्वर निंबोडी), संजय ज्ञानदेव देवकाते (निरावागज) हे नवीन संचालक मंडळात कार्यरत असतील.

याशिवाय अनुसुचित जाती-जमाती प्रवर्गातून सुशांत महादेव जगताप (सुपे), महिला प्रतिनिधी गटातून स्वाती मोहन खामगळ (खामगळवाडी-ढाकाळे), शोभा गोरख जगताप (वडगाव निंबाळकर), इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातून राजेंद्र दत्तात्रय रायकर (काऱ्हाटी ) तर भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून पुरुषोत्तम शिवाजी गाढवे (आंबी खुर्द) यांचा नवीन संचालक मंडळात समावेश आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाचे कामकाज चालते. स्थापनेपासूनच संघावर पवार कुटुंबियांच्या अधिपत्याखालील पॅनेलची सत्ता आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दूध संघाची निवडणूक बिनविरोध करत विरोधी पक्षांना बारामतीत जोरदार झटका दिला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news