शिरूरवरून युती अन् आघाडीतही बिघाडी? तिकिटासाठी हायहोल्टेज ड्रामा | पुढारी

शिरूरवरून युती अन् आघाडीतही बिघाडी? तिकिटासाठी हायहोल्टेज ड्रामा

किरण जोशी

पिंपरी : राज्यात महाविकास आघाडीवरून रणकंदन सुरू असतानाच शिरूर मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आढळराव-पाटील यांच्या लढाईत भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि आमदार महेश लांडगे यांनी उडी घेतल्याने रंगत वाढली आहे. या सर्वांनीच संभाव्य उमेदवार म्हणून शड्डू ठोकल्याने युती आणि आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडणार्‍या मतदारसंघात शिरूरचाही समावेश झाला आहे.

भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुरुवारी झळकलेल्या होर्डिंगवर भावी खासदार असा उल्लेख असल्याने चर्चा सुरू झाली. लांडे यांनीही कुठलेही आढेवेढे न घेता पक्षनिष्ठा आणि यापूर्वीच्या अनुभवाचा दाखला देत आपण शिरूरसाठी दावेदार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर ही चर्चा प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचली. विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपशी जवळीक साधल्याच्या चर्चेला ऊत आला होता. उत्तम वक्ता असणार्‍या डॉ. कोल्हेंचे नाव राष्ट्रवादीने स्टार प्रचारकाच्या यादीतून वगळल्यानंतर दरी वाढल्याची चर्चा झाली. ही राळ बसण्यापूर्वीच लांडे यांनी उघडपणे इच्छा व्यक्त केली. राष्ट्रवादीमधील ज्येष्ठ नेते म्हणून लांडे यांची ओळख आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीचा अनुभव आहे. शरद पवार यांचे अत्यंत जवळचे आणि अजित पवार यांच्याही ते निकटचे आहेत. त्यामुळे त्यांच्या दाव्यामुळे डॉ. कोल्हेंची कोंडी झाली आहे. लांडेंनी इच्छा व्यक्त केल्यावर वरकरवी त्यांना शुभेच्छा देताना कोल्हेंनी आपल्या विकासकामांचा पाढा वाचला आणि अद्याप अपेक्षा सोडली नसल्याचे स्पष्ट केले. या दावा-प्रतिदाव्यामुळे राष्ट्रवादीच्या रूपाने महाविकास आघाडीमध्ये शिरूरवरून बिघाडीचे ढग दाटले आहेत.

दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघात सलग दोन टर्म खासदारकीचा अनुभव असणारे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना बळ दिले आहे. शिरूर लोकसभा म्हणजे शिवसेना अर्थात आढळराव-पाटील..! असे समीकरण होते. गतवर्षी अनपेक्षितपणे त्यांना डॉ. कोल्हेंकडून पराभव पत्करावा लागला; मात्र त्यानंतर त्यांनी मतदारसंघाची नाळ घट्ट जोडून ठेवली. त्यामुळे युतीकडून त्यांना संधी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून आणायचा, असा निर्धार माधुरी मिसाळ यांनी मध्यंतरी एका बैठकीत केला होता. त्यानंतर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी येथून लोकसभा लढण्याच्या दृष्टीने पावले टाकली. पुणे जिल्ह्याचे विभाजन करून शिवनेरी या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याची त्यांची मागणी त्याचाच एक भाग होती. लोकसभेच्या दृष्टीने त्यांनी लोकप्रियतेचा परिघही वाढविण्यास यापूर्वीच सुरुवात केली आहे. भोसरी मतदारसंघाची बांधणी केल्यानंतर बैलगाडासारख्या प्रश्नाचा पाठपुरावा करून त्यांनी शिरूर मतदारसंघात लोकप्रियता मिळविली आहे.

शिरूरमध्ये शिवसेनेच्या भगव्याचा अधिकार असून येथून मीच लढणार असल्याचे आढळराव-पाटील यांनी ठासून सांगितले आहे. आमदार लांडगे यांनी अद्याप उघडपणे इच्छा व्यक्त केलेली नाही. या जागेवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निकटचे लोकप्रतिनिधी इच्छुक असल्याने युतीमध्येही कोंडी होणार असल्याचे स्पष्ट आहे.

मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व!

शिरूर लोकसभा मतदारसंघात हडपसर, भोसरी, शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. भोसरी वगळता पाचही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. विद्यमान खासदारही राष्ट्रवादीचे आहेत. या अर्थाने लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. माजी आमदार विलास लांडे यांना संधी मिळाल्यास या प्राबल्याचा आणि लोकसंपर्काचा त्यांना फायदा घेता येऊ शकतो. याउलट आढळराव पाटील यांना या मतदारसंघातील प्रत्येक खाचाखोचा माहीत आहेत. अनुभव आणि दांडगा लोकसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे, तर आमदार महेश लांडगे यांनीही गेल्या काही वर्षात पक्षात वाढविलेले वजन आणि विकासकामांनी केलेली ढळक प्रतिमा त्यांची जमेची बाजू आहे. मात्र, संधी कोणाला मिळणार, यावर पुढील गणिते अवलंबून आहेत.

लोकसभा निवडणूक (2019):

डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस) : 6 लाख 35 हजार 830
शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना) : 5 लाख 77 हजार 347

हेही वाचा:

बारामती तालुका दूध संघाची निवडणूक बिनविरोध, राष्ट्रवादीचे संघावर एकहाती वर्चस्व

Maharashtra Board SSC Result | दहावीचा निकाल लागताच सिग्‍नल शाळा आनंदाने डोलू लागली, किरण काळे ६० टक्क्यांनी उत्‍तीर्ण

Vat Purnima 2023 | वटपौर्णिमा : जाणून घ्या वटपूजनाचा मुहूर्त आणि महत्व, शास्त्र काय सांगते?

 

Back to top button