पुण्यात पावसाने उडवली दैना, जोरदार वारे, गारांचा पाऊस | पुढारी

पुण्यात पावसाने उडवली दैना, जोरदार वारे, गारांचा पाऊस

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी (दि.१) सायंकाळी जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. पिंपरी भागात गारा पडल्या. दरम्यान, गुरुवारी दिवसभर उन्हाचा तडाखा वाढला होता. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला होता.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले होते. मात्र, ते 35 अंशांपर्यंत होते. बुधवारपासून पुन्हा कमाल तापमान वाढू लागले. गुरुवारी शहराचे तापमान 40 अंशांवर पोहोचले, तर लोहगाव, चिंचवड, मगरपट्टा भागात 41 अंश, तर कोरेगाव पार्कमध्ये तापमान 41.8 अंश नोंदले गेले आहे. गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान शहरात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तर, पिंपरी भागात गारा पडल्या.

जोरदार वाऱ्यामुळे शहरातील पुणे ग्रामीण मुख्यालय, चव्हाणनगर येथे झाडाची फांदी चारचाकी वाहनावर पडल्यामुळे वाहनांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार औंध, खडकी, बोपोडी परिसरात 25 झाडपडीच्या घटना घडल्या. याशिवाय, येरवडा मेंटल कॉर्नर, हडपसर या भागात झाडपडी होऊन आठ वाहनांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने कार्यवाही करीत वाहनांवर पडलेल्या झाडांच्या फांद्या दूर केल्या. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवडाभर सकाळच्या वेळी आकाश निरभ्र राहील, तर संध्याकाळी आकाश अशंत: ढगाळ राहील.

शहरात पडलेला पाऊस ( सायंकाळी सात वाजेपर्यंतची नाेंद मि. मी.मध्ये )

शिवाजीनगर- 0.9, पाषाण- 7.5, लवळे 0.5 , एनडीए- 0.5

हेही वाचा:

पुणे : नाट्यगृहांच्या वार्षिक उत्पन्नात घट, उपनगरात प्रतिसाद कमी; सुविधांचा अभाव कायमच चर्चेचा विषय

पुण्यात शहरी गरीब योजनेला एजंटचे ग्रहण ! शहराबाहेरील व्यक्तींची बनावट कागदपत्रांच्या आधारे काढली कार्ड

 

Back to top button