आंबवणे येथे जिल्हा सहकारी बँक लुटण्याचा प्रयत्न फसला - पुढारी

आंबवणे येथे जिल्हा सहकारी बँक लुटण्याचा प्रयत्न फसला

वेल्हे (पुणे), पुढारी वृत्तसेवा : वेल्हे तालुक्यातील नसरापूर-वेल्हे (आंबवणे) रस्त्यावरील भरवस्तीतील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेची तिजोरी न उघडल्याने लाखो रुपये, किंमतीचा ऐवज लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. हा प्रकार गुरुवारी (दि. २१) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेने राजगड भागासह वेल्हे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी बँकेचे आंबवणे शाखा व्यवस्थापक बी. एस. साळूंखे यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बँकेवर पहारा देण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात असतानाही चोरट्यांनी बँकेच्या पाठीमागे असलेली खिडकी तोडून बँकेत प्रवेश केला. बँकेच्या सायरनच्या वायरी तोडल्या. त्यानंतर तिजोरी फोडण्यासाठी जवळील हत्याराने अटोकाट प्रयत्न केले. मात्र, तिजोरी उघडली नाही. हा सर्व प्रकार बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाला आहे.

चोरट्यांना सीसीटीव्ही कॅमेराच्या वायरी दिसल्या नसल्याने सीसीटीव्ही यंत्रणा बंद करता आली नाही. आज सकाळी दहा वाजता नेहमीप्रमाणे बँकेचे कर्मचारी, व्यवस्थापक बँकेत आले. त्यावेळी पाठीमागे असलेली खिडकी तोडल्याचे दिसले. बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे तसेच बँकेतील कागदपत्रे, साहित्य पडल्याचे दिसले.

त्यानंतर शाखा व्यवस्थापक साळूंखे यांनी वेल्हे पोलिसांना माहिती दिली. वेल्हे पोलीस ठाण्याचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक महेश कदम, गोपनीय विभागाचे  अभय बर्गे, प्रदीप कुदळे, विशाल मोरे, कांतीलाल कोळपे, अजय साळुंके यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता बँकेची तिजोरी चोरट्यांना उघडता आली नाही. चोरट्यांनी बँकेच्या साहित्य, वस्तू चोरल्या नसल्याचे निष्पन्न झाले. ठसे तज्ज्ञ तसेच श्वान पथकास पाचारण करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयिताना तातडीने ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी सुरू केली आहे.

Back to top button