BJP Vs Congress : “काड्या करणे, एकमेकांची जिरवणे काॅंग्रेसची परंपरा” | पुढारी

BJP Vs Congress : "काड्या करणे, एकमेकांची जिरवणे काॅंग्रेसची परंपरा"

नागपूर, पुढारी वृत्तसेवा

विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात आपण महाराष्ट्राचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार (BJP Vs Congress) यांना कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही. वडेट्टीवारांनी तशी वक्तव्ये करून बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये, असा टोला केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे.

नांदेड येथील देगलूर बिलोली पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ बोलताना वडेट्टीवार यांनी फडणवीस यांच्या विरोधात गडकरी यांनी आपल्याला गुपचूप काही तरी सांगितले, असे वक्तव्य केले होते. गडकरी आणि फडणवीस यांच्यात जमत नाही. दोघांमध्ये ३६ चा आकडा आहे. गडकरींनी फडणवीसांची चांगलीच जिरवल्याचे मला कानात सांगितले आहे. आता आणखी जिरवणार असल्याचा दावाही वड्डेटीवार यांनी केला. नागपुरवाल्यांना फडणवीस आणि गडकरी यांच्यातील संबंध चांगले माहीत आहे. असे वक्तव्य वड्डेटीवार यांनी केले होते.

वडेट्टीवार यांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे. फडणवीस माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. एकमेकांच्या विरोधात काड्या करणे आणि एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे तशा प्रकारचा संभ्रम काँग्रेसचे मंत्री वडेट्टीवार आमच्याही बाबतीत निर्माण करू पाहतात, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्राची प्रगती झाली. विरोधी पक्ष नेते म्हणूनही ते उत्तम काम करीत आहेत. महाविकास आघाडीच्या चुकांवर नेमके बोट ठेवून ते लोकशाहीतील विरोधकांचे कर्तव्य निभावत आहेत. सरकार तीन पक्षांचे असले तरी काँग्रेसमध्ये नैराश्य (BJP Vs Congress) आहे. त्यांना कुणीही मोजत नाही. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी वडेट्टीवार यांच्यासारखे काँग्रेसी नेते अशा प्रकारची वक्तव्ये करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही गडकरी यांनी केला आहे.

Back to top button