… आणि त्यांनी केले 53 व्या वर्षी अवघ्या 12 तासांत तीन गड सर

विष्णू ताम्हाणे
विष्णू ताम्हाणे

अशोक मोराळे

पुणे : 'वडिलांना पॅरालिसिस झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. अशातच त्यांच्या डाव्या पायाच्या मांडीचे हाड मोडले. 2015 पर्यंत त्यांच्या हालचाली व्यवस्थित होत्या. मात्र, 2016 पासून त्यांच्या चालण्यावर मर्यादा येऊ लागल्या. एकदा इमारतीचा जिना चढता येत नसल्यामुळे मी त्यांना चौथ्या मजल्यावर पाठीवर उचलून नेले. त्या वेळी मला जाणवले की आपण शारीरिकदृष्ट्या आणखी
तंदुरुस्त असण्याची गरज आहे.'

त्याच प्रेरणेतून मी धावण्यास सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांत मी तब्बल 17 ते 18 हजार किलोमीटर धावलो असून, अद्यापदेखील माझा हा छंद नित्यनेमाने सुरू आहे. त्यातून काम करण्याची सकारात्मक प्रेरणा आणि छंद जोपासण्याची ऊर्जा मिळते…सांगत होते विष्णू ताम्हाणे. ताम्हाणे हे सध्या पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील समर्थ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. धावणे आणि सायकलिंग करण्याचा छंद गेल्या अनेक वर्षांपासून ते जपत आहेत.

प्रत्येक स्पर्धेत सहभाग

शहरातील कोणत्याही ठिकाणी धावण्याची स्पर्धा असो, तेथे ताम्हाणे नाहीत असे होत नाही. 11 डिसेंबर 2021 ला वयाच्या 53 व्या वर्षी ताम्हाणे यांनी सिंहगड, राजगड, तोरणा (एसआरटी) हा 12 तासांच्या आत 53 किलोमीटरचा ट्रेक पूर्ण केला. 42 किलोमीटरच्या फुल मॅरेथॉन, बोपदेव घाटातील हिल मॅरेथॉन पूर्ण केली. आतापर्यंत ताम्हाणे यांनी 4 फुल मॅरेथॉन, 25 पेक्षा अधिक हाफ मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. पोलिस ठाण्याच्या हद्दीत सायकल पेट्रोलिंगचा उपक्रमदेखील त्यांनी सुरू केला आहे.

ताम्हाणे मूळचे फलटण तालुक्यातील पवारवाडीचे. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी. आई-वडील दोघेही अशिक्षित. घरात शिक्षणाचा गंध नाही. अशा परिस्थितीत त्यांनी सातारा येथे आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केले. 1987 मध्ये तीन महिने भारत फोर्ज या कंपनीत पुण्यात नोकरी केली. परत सोमेश्वरनगर येथील कॉलेजमध्ये बी. ए. इंग्लिशमध्ये पदवी पूर्ण केली. पुढे पुणे विद्यापीठात एम. ए. करीत असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. 1994 साली पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. 1196 कंधार नांदेड येथील पहिले पोस्टिंग.

तंदुरुस्तीचे महत्त्व पटले

ताम्हाणे सांगतात, 'वडिलांचा आजार खूप काही शिकवून गेला. त्यातूनच शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व मला पटले. 2018 मध्ये अहमदनगर येथे कर्तव्यावर असताना पोलिस मॅरेथॉनमध्ये प्रथम धावलो. 23 मिनिटांत पाच किलोमीटरचा टप्पा मी पूर्ण केला. त्यानंतर नगर रायझिंगमध्ये 51 मिनिटांत 10 किलोमीटर धावून चौथा क्रमांक प्राप्त केला. त्यानंतर सातारा, पुणे येथील विविध मॅरेथॉन स्पर्धांत भाग घेतला. 4 तास 47 मिनिटांत मुंबई येथील टाटा मॅरेथॉनमध्ये 42 किलो मीटर धावलो. कोरोना काळात मुलगा गौरांग याच्यासोबत वैयक्तिक धावणे, सायकलिंग, ट्रेकिंग सुरू ठेवले. ताम्हाणे यांचा शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचा छंद नक्कीच प्रेरणादायी आहे.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news