बारामती : काटेवाडीत इमारत उचलून नऊ फूट मागे नेण्याचा प्रयोग; पालखी मार्गात येत होती इमारत | पुढारी

बारामती : काटेवाडीत इमारत उचलून नऊ फूट मागे नेण्याचा प्रयोग; पालखी मार्गात येत होती इमारत

बारामती; पुढारी वृत्तसेवा : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या भूसंपादनात जाणारी दोन मजली इमारत वडिलांच्या आठवणी जपण्यासाठी चक्क उचलून नऊ फूट मागे सरकविण्याचा प्रयोग बारामती तालुक्यातील काटेवाडीजवळ मासाळवाडी येथे सुरू आहे.

ती इमारत ‘जशीच्या तशी’ पाठीमागे घेण्यात येत आहे. हा प्रयोग पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मुलाणी कुटुंबीयांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही इमारत उभी केली होती. या दुमजली इमारतीला ‘आशियाना कॉम्प्लेक्स’ असे नाव देण्यात आले होते. पालखी मार्गात येणारी ही दुमजली इमारत जमीनदोस्त होणार होती. वडिलांच्या आठवणी या इमारतीशी निगडित असल्याने मुलाणी कुटुंबीय कमालीचे चिंताग्रस्त झाले होते. या इमारतीत वडिलांचे वास्तव्य होते. त्यामुळे ही जुनी आठवण जतन करण्याचा विचार त्यांनी सुरू केला. पालखी महामार्गाला अडसर ठरणारी इमारत न पाडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. इमारत आहे तशी पाठीमागे सरकवता येते, हे ‘सोशल मीडिया’तील काही ‘व्हिडिओ’वरून त्यांना समजले. त्यांनी याच पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरवले.

या भागात हा पहिला प्रयोग असल्याने त्याची उत्सुकता अधिक आहे. काटेवाडीतील अकबर दादासाहेब मुलाणी व हसन मुलाणी या भावंडांनी त्यांची तीन हजार फूट दुमजली इमारत चक्क 9 फूट मागे सरकविण्याचे काम सुरू केले आहे. हे काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. आता हे काम पूर्णत्वाकडे आले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ही इमारत पाच फूट उंच उचलून नऊ फूट मागे घेतली जाणार आहे. यासाठी हरियाणा येथील मोहन लाल हाऊसिग लिफ्टिंग शिफ्टिंग कन्ट्रक्शन कंपनी नूरबाला, पानिपत (हरियाणा) हे प्रशिक्षित ठेकेदार काम करीत आहेत.

मोहनलाल नावाच्या या ठेकेदाराने आत्तापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्लीसह अन्य राज्यांतील एक हजारांहून अधिक इमारती मागे घेतल्याचा दावा केला आहे. आता काटेवाडीतील मासाळवाडी परिसरात हा प्रयोग सुरू आहे.

यासंबंधी बोलताना अकबर मुलाणी म्हणाले, ‘इमारतीचा पाच फूट भाग रस्त्यात जात होता. पाठीमागे स्वतःची जागा शिल्लक होती. इमारत पाडण्यासाठी खर्चही मोठा होता. नव्याने इमारत उभी करण्यासाठी आणखी 50 लाख खर्च झाले असते. सोशल मीडियात हरियाणात या पद्धतीचे काम करणार्‍यांची माहिती मिळाली. त्यांनी इमारत मागे घेण्याचा खर्च 10 लाखांहून अधिक सांगितला. इमारत पाडण्यापेक्षा हा खर्च कमी असल्याने हा पर्याय निवडला. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू आहे.’

अधिक वाचा :

Back to top button