रोहीत पवारांच्या बारामती अँग्रो साखर कारखान्यावर गुन्हा दाखल | पुढारी

रोहीत पवारांच्या बारामती अँग्रो साखर कारखान्यावर गुन्हा दाखल

भिगवण(पुणे), पुढारी वृत्तसेवा : सरकारने निश्चित केलेल्या तारखेच्या आधीच गाळप हंगाम सुरू केल्याबद्दल कर्जत-जामखेडचे आमदार आणि जेष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री समितीच्या निर्णयाचे उल्लंघन करून गाळप केल्याने बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बारामती ॲग्रोचे सर्वेसर्वा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्याने १५ आँक्टोबर २०२२ पूर्वी गाळप हंगाम सुरू केल्याचा दावा भाजप नेते विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी केला होता. यानंतर साखर आयुक्तलयाअंतर्गत विशेष लेखा परिक्षक यांच्या मार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले मात्र त्यांच्या अहवालात विसंगती आढळल्याने लेखा परिपक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

या प्रकरणाच्या चौकशीनंतर दि. ८ मार्च २०२३ रोजी भिगवण पोलिसात बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर भादवी कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारखान्याने गाळप परवाना न घेता १५ आँक्टोबर पूर्वीच गाळप सुरु केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाच्या मंत्री समितीच्या निर्णयानुसार १५ ऑक्टोबरनंतर ऊस गाळप हंगाम सुरू करावयाचा होता; मात्र बारामती ॲग्रो आहे १० ऑक्टोबर २०२२ रोजी हंगाम सुरू केला अशी तक्रार दाखल झाल्यानंतर अप्पर निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांनी दि. ७ डिसेंबर २०२२ मध्ये चौकशी अहवाल सादर केला. त्यामध्ये बारामती ॲग्रो या साखर कारखान्याने मंत्री समितीच्या निर्णयाचे व साखर आयुक्त कार्यालयाच्या परिपत्रकाचे उल्लंघन केल्याचा ठपका गुळवे यांच्यावर ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. यासंदर्भात संजय ठकुजी गोंदे यांनी भिगवण पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल केला आहे.

.हेही वाचा 

Election : पुणे,खडकी कॅन्टोन्मेंट निवडणूक स्थगित 

नाशिक : महिलांनी केला निम्म्या तिकिटात बस प्रवास; महिला सन्मान योजनेला आजपासून सुरुवात

ठाणे : किसान सभेच्या मोर्चेकरांचा वाशिंद येथील मुक्काम वाढणार

Back to top button