ठाणे : किसान सभेच्या मोर्चेकरांचा वाशिंद येथील मुक्काम वाढणार | पुढारी

ठाणे : किसान सभेच्या मोर्चेकरांचा वाशिंद येथील मुक्काम वाढणार

कसारा; पुढारी वृत्तसेवा : किसान सभेचा ‘लॉंग मार्च’ मुंबई -नाशिक महामार्गालगत वाशिंद येथे मुक्कामी असून आज दिवसभर त्यांचा मुक्काम येथील ईदगाह मैदानावर असणार आहे. रात्री पुन्हा आलेल्या अवकाळी पावसामुळे मोर्चेकरांची तारांबळ उडाली. परंतु, शासनाच्या बाजूला असलेल्या इमारतीमध्ये काही मोर्चेकरांची राहण्याची व्यवस्था केली होती. तसेच रात्रीपासून टीडीआरएफ ( TDRF) चे जवान देखील मदतीसाठी तैनात केले होते. जवानासाठी टेंटची उभारणी करून सोय केली होती.

एकंदरीत काल झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झाली असून त्याबाबत आज विधानसभेत चर्चा होऊन मागण्याबाबत ठोस निर्णय होत नाही, याबाबत जी. आर. निघत नाही तोपर्यंत मोर्चेकरी या ठिकाणी थांबणार आहेत. त्यांचे आज समाधान झालं नाही तर पुन्हा उदयापासून हे ‘लाल वादळ’ मुंबईकडे कूच करणार आहे.

आमदार जे. पी. गावित पुन्हा जाणार विधानभवनात

मोर्चेकरांच्या मागण्यांचे निवेदन आज विधानसभेत सादर करणार आहे. यासाठी माजी आमदार जे. पी. गावित आज पुन्हा विधान भवनात जाणार आहेत. मागील अनुभव पाहता मोर्चेकरी माघारी फिरले की, शासन फसवणूक करते. ती फसवणूक पुन्हा व्हायला नको म्हणून आज निर्णय झाल्यावरच माघारी फिरणार अन्यथा हा ‘लॉंग मोर्चा’ विधानभवन गाठणार असे ही जे. पी. गावित यांनी सांगितले.

सरकार आम्हा गरीब आदिवासींची थट्टा करतेय

केंद्रातील सरकार सुरुवातीला आम्हाला मोफत गॅस देऊन आमचे फोटो काढून मोठ- मोठे बॅनर, जाहिराती केल्या. दोन महिन्यानंतर आम्हाला गॅस भरण्यासाठी पैसे मोजावे लागले. अनेक वर्षापासून आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी पायी मोर्चा घेऊन येत आहोत. आमच्या पायांना फोड येतात. कोणी आजारी पडते. ८ वर्षापासूनच्या मुलापासून ८० वर्षाच्या वृद्धापर्यत सर्व जन या मोर्चात सहभागी होऊन २०० ते २५० किलोमीटरचा पायी प्रवास करतात. महाराष्ट्राच्या काना- कोपऱ्यातून आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन सरकारविरुद्ध एल्गार करतोय. पण सरकार आम्हा गरीब आदिवासींची थट्टा करतेय. आम्हाला आश्वासन देऊन आमची खोटी समजूत काढते असा आरोप मोर्चात सहभागी झालेल्या दिंडोरी येथील सिधूबाई या महिलेने केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button