संजय राऊत : ‘मुख्यमंत्री आमचा आहे हे अजित पवारांनी लक्षात ठेवावे’ | पुढारी

संजय राऊत : 'मुख्यमंत्री आमचा आहे हे अजित पवारांनी लक्षात ठेवावे'

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री आमचा आहे हे अजित पवारांनी लक्षात ठेवावे, अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला गेले आहेत हे लक्षात ठेवा असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री दिल्लीला अंदाज घेण्यासाठी गेले आहेत कारण दिल्लीवर शिवसेनेला राज्य करायचे आहे. गृहमंत्री, पंतप्रधान कुठे बसतात याचा अंदाज घ्यायचा आहे अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा भोसरी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राऊत बोलत होते. यावेळी शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहेर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, गटनेते राहुल कलाटे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राज्य संघटक गोविंद घोळवे शहरप्रमुख सचिन भोसले, धनंजय अल्लाट आदी उपस्थित होते.

सरकार आमचे असेल तर आमचे ऐकायलाच हवे

यावेळी संजय राऊत म्हणाले की, पालकमंत्री अजित पवार हे ऐकत नाहीत अशी शिवसैनिकांची भावना आहे. आम्ही त्यांच्याशी बसून बोलू. आमच्या लोकांना नाराज करू नका, माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आत्ताच सांगितले की, येथील पोलीस आयुक्त आमचे ऐकत नाहीत. त्यांनाही मी सांगतो की सरकार आमचे असेल तर आमचे ऐकायलाच हवे.

यावेळी राऊत म्हणाले की, नवीन पिढीने पक्षाचे काम पुढे नेले पाहिजे. आपणच वर्षानुवर्षे खुर्च्या अडवून ठेवतो तेव्हा पक्षाचे गटार होते. त्यात बेडूक राहतात. त्यामुळे नवीन नेतृत्वास बाळासाहेबांनी ताकद दिली त्यांनी ती दिली नसती तर शिवसेना वाढली नसती. ओळख चेहरा नसणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी नगरसेवक, आमदार केले. पदे येतात जातात समोरच्यांना काहीच मिळत नाही पण ते आहेत म्हणून आपण आहोत असे राऊत म्हणाले

आपली ओळख आपण निर्माण केली पाहिजे आणि दिल्लीतील माझा पत्ता मोदी मोदी माझ्या घरासमोर राहतात असे सांगतो असे राऊत म्हणाले. शिवसेनेची ओळख कामातून झाली पाहिजे, भोसरीत पक्षाचा एकही नगरसेवक नाही, भोसरीने हा दिला असता तर आढळराव खासदार झाले असते असे ते म्हणाले.

महापालिकेचे निकालातील आकडे कसे आले तरी शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे. ५५ वर आमचा मुख्यमंत्री होतो, तर चाळीस-पंचेचाळीसला आमचा महापौर व्हावा एवढीच माफक अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचलं का?

Back to top button