बेकायदेशीर गोमांस वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल | पुढारी

बेकायदेशीर गोमांस वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : गाय तसेच (गोमांस) बैलाचे मांसाची बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्या एका आयशर टेम्पोला नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन ४ हजार ५०० किलो वजनाचे अंदाचे ६ लाख ७५ हजार किमतीचे जनावरांचे गोमांस व आयशर टेम्पो जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास देशपांडे व सहायक पोलिस निरिक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

रियाजुद्दीन मेहकु खान (वय २८, सध्या रा. माजीवाडा ब्रिजच्या खाली झोपडपट्टी, ता-जि. ठाणे, मूळ रा. शंकरपूर, जि. बहिराज उत्तर प्रदेश) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २४) १२.३० वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक ताटे यांना बातमी मिळाली की, संगमनेर येथून मिनी आयशर टेम्पो (क्रमांक एमएच ०४ जेयु १५६) या टेम्पोमध्ये गाई व बैलांचे मांस भरून ही गाडी पुणे-नाशिक हायवे रोडने मुंबईकडे जाणार आहे.

मिळालेल्या माहितीची खात्री करून ताटे व पोलीस पथक रवाना होवून सदर गाडी ही नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे) गावच्या हद्दीत पुणे-नाशिक बायपास रोडवर पाटेखैरेमळा चौक येथे मिळून आली. ती ताब्यात घेवून सदर गाडीवरील इसमाकडे चौकशी करून गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये गाय-बैलांचे कापलेले मांस पशुसंवर्धन विभागाचा कोणताही परवाना नसताना वाहतूक करताना आढळून आला. त्यानुसार नारायणगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला गुन्ह्याच्या तपासासाठी अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली नारायणगावचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहायक पोलीस निरिक्षक ताटे, पोलीस उपनिरीक्षक धनवे तसेच पोलीस नाईक दुपारगुडे, पोलीस जवान सातपुते, अरगडे व पथकाने केली.

हेही वाचलत का :

‘बेगम’ अनुजाला सासर आवडतं की माहेर

Back to top button