कात्रज नवीन उड्डाणपूल डबल डेकर; नितीन गडकरी यांची ग्वाही | पुढारी

कात्रज नवीन उड्डाणपूल डबल डेकर; नितीन गडकरी यांची ग्वाही

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कात्रज चौकात प्रचंड वाहतूक कोंडी आहे असून ही कोंडी कमी करण्यासाठी नवीन उड्डाणपूल डबल डेकर असेल, त्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

भविष्यात येथे मेट्रोचे देखील नियोजन होऊ शकते. त्या दृष्टीने कात्रज येथील नवीन सहापदरी उड्डाणपूल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डबल-डेकर करण्यासाठी मार्ग काढू, असेही ते म्हणाले.

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय भारत सरकार, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने 2 हजार 215 कोटी किमतीचा 221 किलोमीटर लांबीच्या 22 महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन आणि लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते केले.

यातीलच कात्रज कोंढवा रस्त्यावरील नवीन सहापदरी उड्डाणपुलाच्या कोनशिलेचे उद्घाटन दीप प्रज्वलन गडकरी यांच्या हस्ते झाले.

तर कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार माधुरी मिसाळ, आमदार मुक्ता टिळक, आमदार चेतन तुपे, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर व स्थानिक नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.

यावेळी गडकरी म्हणाले, ‘सातारा रस्त्यावर अपघात होत आहेत. त्यामुळे आम्ही येथील टोल टर्मिनेट केले आहेत. त्याचबरोबर येथील अपघात कमी होण्यासाठी एका उत्तम संस्थेकडून त्याचा अभ्यास करण्यात येत आहे.

पुणे तळेगाव चाकण शिक्रापूर अन पुणे ते शिरूर मार्गावर मोठा प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पुनवडी, कडेपठार, बारामती, फलटण 365 कोटीचा 34 किमीचा प्रकल्पाला मंजुरी देतो. त्याचे काम या वर्षात सुरु करणार आहे.

सातारा- कागल रस्त्याचे उद्या भूमिपूजन करणार आहे. कोल्हापूर मध्ये पुलावर पाणी येते. त्यावर देखील आम्ही तेथे गेल्यावर मार्ग काढणार आहे. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गाचे चौपदरीकरण 21 कोटी रुपयांचे मंजूर करण्यात आले आहे त्याचे देखील काम लवकर करण्यात येईल.

दक्षिणेकडून पुण्यात येणारी वाहतूक वळवणार

दोन महत्त्वाचे रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे आंध्र कर्नाटक बेंगलोर या दक्षिण भागातून पुणे मुंबई मधून उत्तरेकडे पंजाब दिल्ली कडे जाणारी वाहतुक या दोन नव्या महत्त्वाच्या मार्गामुळे पुर्णता वाहतूक बदलणार आहे.

ही वाहतूक सुरत अहमदनगर अक्कलकोट या मार्गे उत्तरेकडे जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांचे पाचशे किलोमीटर अंतर वाचणार असून आठ तासाचे वेळ कमी होणार आहे असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

पालखी मार्गाचे 6 पॅकेजमध्ये मार्ग

6 पॅकेज मध्ये ज्ञानेश्वर पालखी मार्ग आहे. 234 किलोमीटर 6 हजार 710 कोटींचा आहे. सहा पॅकेज पैकी तीन पॅकेज वर काम चालू आहे. एक पॅकेजची निविदा प्राप्त झाली आहे. उर्वरित दोन पॅकेजच्या निविदा प्रोसेसमध्ये आहेत. फक्त काही ठिकाणी जागा ताब्यात घेण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सुटल्यावर पालखी मार्ग महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखले जाणार आहे.

तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग चार हजार कोटींचा आहे त्याच्याही तीन पॅकेजच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन, त्याच्याही कामाला सुरुवात होणार आहे.

रिंग रोड बांधायची आमची तयारी

रिंगरोड हा पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो बांधायचे देखील आमची तयारी आहे. फक्त महाराष्ट्र शासनाने याच्या जागा ताब्यात घेऊन आम्हाला कळवावे, त्यानंतर लगेचच आम्ही ही कार्यवाही पूर्ण करू, असेही गडकरी य वेळी म्हणाले.

Back to top button