Chandrakant Patil म्हणाले, कायद्याची लढाई कायद्यानं लढा, कोल्हापुरी चपलेनं नको! | पुढारी

Chandrakant Patil म्हणाले, कायद्याची लढाई कायद्यानं लढा, कोल्हापुरी चपलेनं नको!

पुणे; पुढारी ऑनलाईन : किरीट सोमय्‍यांकडून माझ्‍यावर करण्‍यात येणार्‍या आरोपामागील मास्टरमाईंड हे भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील हेच आहेत, असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उत्तर दिले आहे. माझं नाव घेतल्याशिवाय मुश्रिफांना झोप लागत नाही. कायद्याची लढाई कायद्याने लढा. कोल्हापुरी चपलेनं नको, असा सूचक इशारा पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला आहे.

कोल्हापूरला चाललेल्या किरीट सोमय्यांना कराडमध्ये पोलिसांनी रोखले. या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, आरोप करणाऱ्या सोमय्यांवर जिल्हाबंदीची कारवाई कशासाठी? असा सवाल केला.

ईडीची लढाई लढताना तोंडाला फेस येईल. गृहखाते कामाला लावून राज्यात कारवाई केली जात आहे. पैशाचा माज गृहखात्याच्या काराभारामुळेच, अशा शब्दांत पाटील यांनी मुश्रीफ यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला.

महाविकास आघाडीत समन्वय नाहीत. सर्व यंत्रणा मोडण्याचे काम चालले आहे. मला जे शरद पवार माहित आहेत ते अशा कोणत्याही गोष्टीला पाठीशी घालत नाही. पवार अशाप्रकारे चुकीच्या गोष्टीच्या मागे उभे राहणार नाहीत, असेही ते म्हणाले.

गडहिंग्लज कारखान्याबाबत सोमय्यांनी जी माहिती दिली आहे ती चुकीचे आहे हे सांगा, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

मुश्रीफांना ऑफर नव्हती…

मला भाजपमध्‍ये येण्‍याची ऑफर चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. मी ती धुडकावली. त्यामुळे माझ्‍यावर आरोप सुरु करण्‍यात आल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले होते. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी, मुश्रीफांना ऑफर नव्हती. ऑफर नाकारल्यानंतर त्रास देण्याची आमची वृत्ती नाही, असे म्हटले आहे.

Back to top button