

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. यावर आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (दि.१४) केले. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.
पवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित कार्यक्रमावेळी मोठी गर्दी झालेली होती. त्यावेळी आव्हाड यांचा एका महिलेला नजरचुकीने धक्का लागल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी विनयभंग घडला नाही, तसे सांगितले पाहिजे, कारण ते तिथे उपस्थित होते. आव्हाड यांच्यावर खोटे आरोप, खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, सध्या गलिच्छ पद्धतीचे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्राला अशा घटना परवडणाऱ्या नाहीत. राज्यात कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे, असेही पवार म्हणाले.
कळवा पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर महिलेशी गैरवर्तन केल्याचा आरोप आव्हाड यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी व्हिडिओची तपासणी करून आव्हाड यांच्याविरुद्ध कलम 354 चा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. कार्यक्रम संपल्यानंतर गर्दीत आव्हाड यांनी एका महिलेचा हात धरून तिला बाजूला सारले. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. याविषयी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यानंतर आव्हाड यांनी ट्विट करून आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याची म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंग गुन्ह्याचा महाविकास आघाडीकडून निषेध करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या महिला शिष्टमंडळात अभिनेत्री खासदार जया बच्चन, प्रियंका चतुर्वेदी, फौजिया खान, आमदार ऋतुजा लटके, आमदार सुमन पाटील, अदिती तटकरे यांचा समावेश आहे.
हेही वाचलंत का ?