पुणे: महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणारा निघाला अट्टल मोबाईल चोर | पुढारी

पुणे: महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणारा निघाला अट्टल मोबाईल चोर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या एकाने मोबाईल चोरी केली. यानंतर त्याला बिबवेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख ८८ हजार रूपये किंमतीचे २१ मोबाईल फोन जप्त केले आहेत.

तानाजी शहाजी रणदिवे ( वय ३३, रा. शांतीनगर, रामटेकडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण शहरात मोठ्या प्रमाणात मोबाईल चोर्‍या होत होत्या. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल झावरे व गुन्हे निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलिस निरीक्षक राजेश उसकांवकर हे बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते.

याच दरम्यान अमंलदार सतिश मोरे यांना महावीर गार्डनच्या जवळ मुख्य रस्त्यावर गंगाधाम रोड या ठिकाणी चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आगारे पोलिसांनी येथे सापळा लावला.

यादरम्यान तानाजी रणदिवे हा रस्त्याने येणार्‍या- जाणार्‍या नागरिकांना मोबाईल विकत घेण्याबाबत विचारणा करताना आढळून आला. यानंतर पोलिस पथकाने तानाजीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपासणी केली असता त्याच्याजवळ ६ मोबाईल सापडले. या मोबाईलबाबत विचारणा केल्यानंतर त्याने पहिल्यांदा उडवाउडवीची उत्तरे दिली.

५० हून अधिक मोबाईलची केली चोरी

तानाजी पोलिसांनी सखाल चौकशी केल्यावर त्याने स्वत: महापालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी करत असल्याचे सांगितले. तसेच त्याने कर्ज फेडण्यासाठी बिबवेवाडी, मार्केट यार्ड परिसरातून जवळपास ५० हून अधिक मोबाईलची चोरी करत असल्याचे सांगितले. याच दरम्यान त्याने काही मोबाईल अनोळखी व्यक्तींना विकल्याचे सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख ८८ हजार रूपये किंमतीचे २१ मोबाईल फोन जप्त केले आहेत.

उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश उसगांवकर, अमलदार सतिश मोरे, तानाजी सागर, राहुल शेलार यांनी ही कारवाई केली. यानंतर तानाजी रणदिवे याच्यावर बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : बाप्पाचे प्रिय उकडीचे मोदक

Back to top button