Pune News : ससूनमध्ये आठ महिन्यांत 3 लाख रुग्णांवर उपचार

Pune News : ससूनमध्ये आठ महिन्यांत 3 लाख रुग्णांवर उपचार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून सर्वोपचार रुग्णालयात केवळ जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्यभरातून रुग्ण उपचारांसाठी येतात. दररोज दीड ते दोन हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतात. गेल्या आठ महिन्यांमध्ये बाह्यरुग्ण विभागात तब्बल 2 लाख 94 हजार 580 रुग्णांनी उपचार घेतले आहेत. सर्दी, खोकला, ताप अशा किरकोळ तक्रारींपासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजारापर्यंत सर्व प्रकारचे उपचार ससून रुग्णालयात उपलब्ध आहेत. गरीब आणि गरजू रुग्णांसाठी ससून मोठा आधार ठरते. मात्र, रुग्णांना अस्वच्छता, असुविधा यांचा बरेचदा सामना करावा लागतो.

त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने रुग्णसेवेला अधिकाधिक प्राधान्य देण्याची गरज वारंवार अधोरेखित होत आहे. ससून रुग्णालयात डोळे, कान, नाक, घसा, अस्थिव्यंग, स्त्रीरोग आणि प्रसूती, बालरोग, दंतरोग, मज्जातंतू विकास अशा विविध आजारांवर उपचार दिले जातात. विविध प्रकारच्या अपघातात जखमी झालेल्यांना विशेष करून उपचार मिळतात, याशिवाय, हृदयरोग, कॅन्सर, मूत्रपिंड, यकृताचे आजार अशा मोठ्या आजारांवरील उपचारांसाठीही रुग्ण येतात. प्लास्टिक सर्जरी, बॅरियाट्रिक सर्जरी असे उपचार नव्याने सुरू करण्यात आले आहेत.

सुपरस्पेशालिटी सुविधांचा अभाव

ससून रुग्णालयामध्ये सर्वसामान्य गरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशा सुपरस्पेशालिटी सुविधा नाहीत. खासगी रुग्णालयांमधील खर्च परवडत नसल्याने रुग्णांना उपचारांपासून वंचित राहावे लागते. या सुविधा तातडीने वाढवाव्यात, अशी अपेक्षा रुग्णांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली आहे. कुशल मनुष्यबळाच्या अभावामुळे सुविधा सुरू करण्यास अडथळे येत आहेत.

ससून रुग्णालयातील उपचारांची आकडेवारी

महिना        बाह्यरुग्ण विभाग    आंतररुग्ण विभाग
जानेवारी        39,138                 5890
फेब—ुवारी     34,273               5462
मार्च              37,357               5314
एप्रिल            33,785               5533
मे                 34,223              5766
जून               33,531               5713
जुलै               39,630              5786
ऑगस्ट          42,643               6327
एकूण         2,94,580            45,791

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news