पुणे : मलठण येथील भीमा नदीपात्रात वाळू उपसा; ७२ लाखाचा मुद्देमाल जप्त | पुढारी

पुणे : मलठण येथील भीमा नदीपात्रात वाळू उपसा; ७२ लाखाचा मुद्देमाल जप्त

रावणगाव, पुढारी वृत्तसेवा : मलठण (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळू उपसा केंद्रावर दौंड पोलिसांनी मंगळवारी (दि. ९) छापा टाकला. या छाप्यात ७२ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन फायबर बोटी व त्यामधील सात ब्रास वाळू पाण्यात बुडवून नाश केली आहे, तर १५ हून अधिक वाळू माफियांवर गुन्हा दाखल केला आहे. वाळू चोरी आरोपीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांची नावे आल्याने खळबळ उडाली आहे.

विदर्भात पावसाचा हाहाकार: नागपुरातील दोनशे वर्ष पुरातन शिवमंदिर कोसळले; पाच जण जखमी

संभाजी मनोहर येडे (रा. खानावटा, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तर गणेश मारूती शेंडगे, घनशाम विश्वनाथ देवकाते, नवनाथ दगडू वाघमोडे, गोरख नामदेव वाघमोडे, आबा पाडूरंग सरोदे, गोरख अरून वाघमोडे (सर्व रा. मलठण, ता. दौंड) आणि सहा ट्रकवरील पळून जाणारे चालक व त्यांचे मालक यांच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी असिफ नबिलाल शेख (वय ४४, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण) यांनी सरकारतर्फे दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलठण (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलीस हवालदार असिफ शेख यांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, पोलिसांना वरील आरोपी बेकायदा विनापरवाना भीमा नदीच्या पात्रातून फायबर बोटीच्या सहाय्याने वाळू काढत असल्याचे आढळून आले.

उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेत द्वंद्व, म्हणून सेना फुटली : आशिष शेलार

पोलिसांनी सदर ठिकाणाहून सहा ट्रक, दोन फायबर बोटी व त्यामधील सात ब्रास वाळू असा माल ताब्यात घेतला. त्यातील दोन फायबर बोटी व त्यामधील सात ब्रास वाळू पाण्यात बुडवून नाश केली आहे. ट्रक चालक संभाजी येडे याला ताब्यात घेतले आहे. सर्व ट्रक पोलिस मित्र व ग्रामस्थांच्या मदतीने पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. तपास दौंड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.

भाजप मित्रपक्षाला कधीही धोका देत नाही : देवेंद्र फडणवीस

Back to top button